होय, आम्ही एचआयव्हीसोबत जगत आहोत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 12:52 AM2020-03-08T00:52:37+5:302020-03-08T00:53:55+5:30

स्वत:ला एचआयव्हीची लागण झाली हे कळल्यावरसुद्धा त्यांनी स्वत:ला सावरून जगण्याची उमेद निर्माण केली

Yes, we are living with HIV | होय, आम्ही एचआयव्हीसोबत जगत आहोत

होय, आम्ही एचआयव्हीसोबत जगत आहोत

Next
ठळक मुद्देमहिला दिन विशेषएचआयव्हीग्रस्त महिलांची प्रेरणादायी कथा इतरांना मार्गदर्शक

संजय पाटील ।
अमळनेर, जि.जळगाव : एचआयव्हीची लागण झाली म्हणजे मृत्यू जवळ आला, असे समजून अनेकांची पाचावर धारण बसते. मात्र एड्सने पतीचा मृत्यू झाला, स्वत:ला एचआयव्हीची लागण झाली हे कळल्यावरसुद्धा त्यांनी स्वत:ला सावरून जगण्याची उमेद निर्माण केली म्हणून त्या दोघी धाडसाने म्हणतात, ‘होय, आम्ही एचआयव्हीसोबत जगत आहोत.’ मृत्यूच्या दारात गेलेल्या दोघं इतरांसाठी मात्र प्रेरणादायी ठरल्या आहेत. स्वत:च्या जीवनाला नवी दिशा देऊन इतरांना दिशा देत आहेत.
४० वर्षीय साधना बडगुजर आपली कथा सांगताना म्हणतात, ‘विवाहानंतर एक वर्षात मुलगी झाली आणि पुढच्याच वर्षी डॉक्टर असलेले पती आजारी पडले. सर्व तपासण्या केल्या अन् अचानक आलेल्या वावटळीत माझी फुलबाग उद्ध्वस्त झाली. आरसा तडकावा तशी मनाची काच कचकन फुटली.’
पतीला एचआयव्ही झाल्याचे कळले आणि एक वर्षात त्यांचा मृत्यू झाला. नंतर साधना यांचीही तपासणी केली. त्यांनाही एचआयव्हीची लागण झालेली होती. अवघे बारावीपर्यंत शिक्षण होते. सासऱ्यांनी सहकार्य केल्याने पदवीपर्यंत शिक्षण घेतले. शिवण काम सुरू केले. जिद्दीने शेती काम शिकल्या. डोळ्यासमोर लहान मुलगी दिसत होती. मुलगी १८ महिन्यांची होताच तिची तपासणी करण्यात आली. मात्र तिला एचआयव्हीची लागण नव्हती, हे कळताच आंनद झाला. तिच्यासाठी जगण्याची नवी उमेद निर्माण झाली.
आधार संस्थेकडून मिळाला ‘आधार’
एआरटी सेंटरमध्ये जाऊन औषधी घेतली आणि आधार संस्थेच्या अध्यक्ष भारती पाटील यांच्याकडून आधार मिळाला. पालकांपासून बालकांना होणाºया एचआयव्हीपासून बचाव कसा करायचा यावर गरोदर महिलांना मार्गदर्शन करण्याचे पियर एज्युकेटर काम मिळाले. जीवन कसे जगायचे, संघर्ष कसा करायचा यासाठी प्रेरणा मिळाली. त्या इतरांनाही मार्गदर्शन करू लागल्या. मुलीला आयटीआय केले. तिला नोकरीला लावले. तिचे लग्न केले. आता सारे कुटुंब आनंदात आहे. अजून जगायला आवडेल हे सांगताना साधना म्हणाल्या, आज आमच्या अश्रूमध्ये तेज आहे, पुढे जगण्याची आमच्यात आता उमेद आहे.’
एडस्ग्रस्त पतीने केली आत्महत्या
दुसरी तेजस्विनी (वय ४०) (नाव बदलले आहे) म्हणते की, आई वडिलांनी २० वर्षांपूर्वी मोठ्या गावाचे सधन शेतकरी म्हणून लग्न लावले. दोन मुले झाली. त्यात एक दिव्यांग आणि अचानक सहा वर्षात पतीला एचआयव्ही असल्याचे कळले. आजाराला कंटाळून पतीने आत्महत्या केली. स्वत:ची तपासणी केली. तेव्हा कळले की, आपल्यालादेखील एचआयव्हीची लागण झाली आहे. मरण जवळ दिसत होते. पती गेल्यानन्तर सहकार्य मिळत नाही. मुलांची चाचणी केली. पण त्यांना काहीच निघाले नाही म्हणून त्या मुलांसाठी निर्धाराने जगण्याचा निर्णय घेतला. आधार संस्थेच्या भारती पाटील यांनी बाह्य संपर्क कार्यकर्ता म्हणून पगारावर नोकरी दिली. त्यातून घरभाडे, मुलांचा दवाखाना, शिक्षण आदी खर्च भागवला जातो. हे करत असताना पतीची वारस म्हणून मालमत्ता मिळण्यासाठीही संघर्ष करावा लागत आहे. एकदा एका गाठीची शस्त्रक्रिया करायची होती. पण एचआयव्ही असल्याचे कळताच किमान १० डॉक्टरांनी नकार दिला. मात्र एक डॉक्टरने भारती पाटील यांच्या सहकार्याने शस्रक्रिया केली. आजारामुळे थकवा जाणवतो. मात्र ज्याच्यामुळे आपले आयुष्य उद्ध्वस्त झाले त्या आजारामुळे इतरांचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये म्हणून अशा महिलांना प्रेरणा, मार्गदर्शन केल्याने स्वत:च्या आजाराचा दोघांना विसर पडला आहे. सर्वसामान्य महिलांप्रमाणे त्या एचआयव्ही आजाराला घेऊन जगत असताना इतरांसाठी मात्र प्रेरणादायी ठरल्या आहेत.

Web Title: Yes, we are living with HIV

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.