हो बेखबर, तो सुनो खुशखबर; रेल्वे प्लॅटफाॅर्म तिकीट पुन्हा १० रुपये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:18 IST2021-09-18T04:18:07+5:302021-09-18T04:18:07+5:30
जळगाव : कोरोना काळात करण्यात आलेले प्लॅटफाॅर्म तिकीट रेल्वे प्रशासनाने पुन्हा १० रुपये केले आहे. यामुळे प्रवाशांचा एका ...

हो बेखबर, तो सुनो खुशखबर; रेल्वे प्लॅटफाॅर्म तिकीट पुन्हा १० रुपये
जळगाव : कोरोना काळात करण्यात आलेले प्लॅटफाॅर्म तिकीट रेल्वे प्रशासनाने पुन्हा १० रुपये केले आहे. यामुळे प्रवाशांचा एका तिकिटामागील ४० रुपयांचा भुर्दंड कमी झाला असून, प्रवाशांना स्टेशनवर नातेवाइकांना सोडण्यासाठी जाणे स्वस्त झाले आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर रेल्वे प्रशासनाने काही महिने प्लॅटफाॅर्म तिकीट बंद ठेवले होते. त्यानंतर गेल्या वर्षी नोव्हेंबरपासून प्लॅटफाॅर्म तिकीट द्यायला सुरुवात करून, हे तिकीट १० रुपयांवरून ५० रुपये ठेवले होते. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे स्टेशनवरील प्रवाशांची गर्दी कमी व्हावी, या उद्देशाने रेल्वे प्रशासनाने प्लॅटफाॅर्मचे तिकीट ५० रुपये केले होते. यामुळे स्टेशनवर नातलगांना सोडण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दीही कमी झाली होती. दरम्यान, कोरोनाचा संसर्ग आल्यानंतर रेल्वेने यंदा मार्च महिन्यापासून पुन्हा प्लॅटफाॅर्मचे तिकीट १० रुपये केले आहे. त्यामुळे प्रवाशांना एका तिकिटामागे लागणारा ४० रुपयांचा भुर्दंड कमी झाला आहे. रेल्वे प्रशासनाने प्लॅटफाॅर्मचा तिकीट दर ५० वरून १० रुपये केल्यामुळे, प्रवाशांमधून रेल्वेच्या या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
इन्फो :
सहा ते आठ महिने होता ४० रुपयांचा भुर्दंड
रेल्वे प्रशासनाने स्टेशनवरील गर्दी कमी करण्यासाठी सुरुवातीला मुंबई, पुणे, ठाणे या स्टेशनवरील प्लॅटफाॅर्म दर ५० रुपये केला होता. त्यानंतर टप्प्याटप्प्याने गेल्या वर्षी जून-जुलैमध्ये जळगाव रेल्वे स्टेशनवरील तिकीट दरही ५० रुपये केला. यंदा मार्चर्यंत हा तिकीट दर कायम होता. त्यानंतर कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यापासून हा तिकीट दर ५० वरून १० रुपये करण्यात आला आहे.
इन्फो :
रोज १०० प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री
जळगाव स्टेशनवर सर्व लांब पल्ल्यावरील मार्गाच्या गाड्या थांबत असल्यामुळे या स्टेशनवर सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत प्रवाशांची वर्दळ असते. दिवसभरात या स्टेशनवरून १०० हून अधिक प्लॅटफाॅर्म तिकिटांची विक्री होत आहे. इतर सण, उत्सवांच्या काळात हे प्रमाण जास्त असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
सेवाग्राम एक्स्प्रेस
हावडा एक्स्प्रेस
राजधानी एक्स्प्रेस
कुशीनगर एक्स्प्रेस
काशी एक्स्प्रेस