अरेच्चा... पत्नी महापौर तर पती विरोधी पक्षनेते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:16 IST2021-03-23T04:16:37+5:302021-03-23T04:16:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : महापालिकेत अडीच वर्षांतच भाजपची सत्ता खेचून शिवसेनेने महापालिकेवर भगवा फडकवला आहे. भाजपच्या २७ बंडखोर ...

अरेच्चा... पत्नी महापौर तर पती विरोधी पक्षनेते
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेत अडीच वर्षांतच भाजपची सत्ता खेचून शिवसेनेने महापालिकेवर भगवा फडकवला आहे. भाजपच्या २७ बंडखोर नगरसेवकांच्या जोरावर पहिल्यांदाच महापालिकेत जयश्री महाजन या शिवसेनेच्या महापौर झाल्या असून, भाजपला विरोधात असतानाही आता विरोधी पक्षनेतेपदही मिळणे कठीण झाले आहे. त्यात विद्यमान विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे असल्याने जळगाव महापालिकेतच नाही तर राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच महापालिकेतील महापौरपद हे पत्नीकडे तर मनपा विरोधी पक्षनेतेपद हे पतीकडे असल्याचा योगायोग जळगाव महापालिकेत जुळून आला आहे. विशेष म्हणजे महापौर व विरोधी पक्षनेतेपद हे एकाच पक्षाकडे आहे.
जळगाव महापालिकेच्या २०१८मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ७५पैकी ५७ जागा जिंकून भाजपने एकहाती सत्ता मिळवली होती. शिवसेनेला अवघ्या १५ जागा मिळाल्या होत्या. एमआयएमच्या तीन जागा असल्याने विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेला मिळाले. शिवसेनेचे सुनील महाजन हे गेल्या अडीच वर्षांपासून मनपा विरोधी पक्षनेतेपदाची भूमिका पार पाडत आहेत. दरम्यान, महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीआधीच सत्ताधारी भाजपमधील तब्बल २७ नगरसेवक फुटल्याने भाजपची महापालिकेतील सत्ता गेली आहे. सद्यस्थितीत महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष भाजपच आहे तर २७ बंडखोर नगरसेवक हे सद्यस्थितीत भाजपचेच नगरसेवक म्हणून गणले जात आहेत. बंडखोर नगरसेवकांना अद्यापही स्वतंत्र गट स्थापन करता आलेला नाही. अशा परिस्थितीत विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेकडेच राहिले आहे.
महापौर चुकले तर त्यांचा विरोध घरातूनच होईल
महापालिकेच्या इतिहासात महापौरपद व विरोधी पक्षनेतेपद हे एकाच पक्षाकडे आहे. विशेष म्हणजे महापौर जयश्री महाजन यांनी जर शहराच्या विकासाकडे दुर्लक्ष केले तर त्यांचा विरोध त्यांचे पती सुनील महाजन हे विरोधी पक्षनेते म्हणून करतील, असा गंमतीशीर योगायोग महापालिकेत जुळून आला आहे.
कोट
महापालिकेतील सर्वात मोठा पक्ष सद्यस्थितीत भाजप आहे तर विरोधी पक्ष म्हणून कमी नगरसेवक शिवसेनेकडे आहेत. भाजपच्या २७ नगरसेवकांनी शिवसेनेच्या महापौर उमेदवाराला पाठिंबा दिला तर उपमहापौरपद हे भाजपच्या नगरसेवकाला देण्यात आले आहे. दरम्यान, जे २७ नगरसेवक फुटले आहेत ते अजूनही भाजपचेच नगरसेवक आहेत. अशा परिस्थितीत विरोधी पक्षनेतेपद हे शिवसेनेकडेच राहील.
- नितीन लढ्ढा, नगरसेवक, शिवसेना
जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्हाला कोणत्याही पदाची गरज नाही. महापौर शिवसेनेचा असला तर आम्ही विरोधातच राहू, चुकीच्या कामांना महासभेत विरोध केला जाईल तर विरोधी पक्षनेतेपदाबाबत कायद्याचा अभ्यास करूनच निर्णय घेण्यात येईल.
- भगत बालानी, गटनेते, भाजप