लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील डॉ. अण्णासाहेब जी.डी. बेंडाळे महिला महाविद्यालयाची गुणवत्ता हमी समिती आणि रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी 'कार्य संस्कृती आणि मूल्य संस्कार' या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून व सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ही कार्यशाळा दोन सत्रांत घेण्यात आली. प्रथम सत्रात 'विचार बदला, आयुष्य बदला' या विषयावर रोटरी क्लब प्रमुख वक्ते पंकज व्यवहारे यांनी मार्गदर्शन केले आणि सायकॉलॉजीसंदर्भात सुरुवातीला १२ कर्मचाऱ्यांमध्ये खेळ घेऊन विचार कसा बदलतो, याबद्दल मार्गदर्शन केले. प्रथम सत्राच्या शेवटच्या १० मिनिटांत शंका समाधान यावर प्रश्न उत्तरे करण्यात आले.
शिक्षकेतर कर्मचारी हे संस्थेतील महत्त्वाचा दुवा
दुसऱ्या सत्रात 'कार्य संस्कृती : कौशल्य आणि वृत्ती' विषयावर संवादक व समुपदेशक गिरीश कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. कार्य संस्कृती म्हणजे काय? कार्य संस्कृती म्हणजे आपण काय काम करायचं, कशासाठी करायचं आणि कसे करायचे यावर कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच कार्य संस्कृतीचे किती प्रकार आहेत आणि त्यांचा कसा वापर आपण केला पाहिजे. याबद्दल देखील त्यांनी सांगितले़ अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. गौरी राणे यांनी शिक्षकेतर कर्मचारी हे संस्थेतील महत्त्वाचा दुवा आहे, असे सांगितले.
यांची होती उपस्थिती
रोटरी क्लब जळगावचे संदीप शर्मा, मनोज जोशी, केदार मुंदडा, गिरीश कुलकर्णी, पंकज व्यवहारे, उपप्राचार्य डॉ.व्ही.जे. पाटील, उपप्राचार्य डॉ़ पी.एन. तायडे, महाविद्यालयातील उपस्थित सर्व शिक्षकेतर बंधू आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थितीत होत्या. सूत्रसंचालन प्रा. स्नेहल परशुरामे यांनी केले तर आभार केदार मुंदडा यांनी मानले.