उमेदवारीच्या प्रतीक्षेत कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला; बंडखोरीचे सावट कायम, 'मविआ'त बिघाडी, महायुतीत धाकधूक
By सुनील पाटील | Updated: December 18, 2025 10:33 IST2025-12-18T10:32:55+5:302025-12-18T10:33:36+5:30
जागावाटपावरून उडताहेत खटके

उमेदवारीच्या प्रतीक्षेत कार्यकर्त्यांचा जीव टांगणीला; बंडखोरीचे सावट कायम, 'मविआ'त बिघाडी, महायुतीत धाकधूक
सुनील पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेच्या अंतिम मतदार यादीच्या प्रसिद्धीनंतर शहरात निवडणूक रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे. कोणत्या प्रभागात किती मतदारांचे बळ आहे, हे स्पष्ट झाल्याने राजकीय पक्षांनी आता प्रत्यक्ष मैदानात कंबर कसली आहे. एकीकडे वरिष्ठ पातळीवर 'महायुती' व 'महाविकास आघाडी'च्या युतीच्या चर्चा असताना, स्थानिक पातळीवर सर्वच पक्षांनी सर्व ७५ जागांची तयारी सुरू केल्याने गोंधळ निर्माण झाला आहे.
मात्र बाहेरून येणाऱ्यांना रेड कार्पेट मिळणार का? आणि पाच वर्षे प्रभागात घाम गाळणाऱ्या कार्यकर्त्याला डावलले जाणार का या प्रश्नांनी इच्छुकांची झोप उडाली आहे. असे झाले तर दोन्ही आघाड्यांत बंडखोरीचे 'भूत' मानगुटीवर बसण्याची शक्यता आहे.
भाजप-शिंदे सेना या दोन्ही पक्षांच्या मुलाखतींची प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यांनी उमेदवारांची यादी तयार ठेवली आहे. अजित पवार गट युतीकडे लक्ष ठेवून आहे. राष्ट्रवादी व उद्धवसेनेत जागावाटपावरून खटके उडाले आहेत.
एकूण प्रभाग किती आहेत? - १९
एकूण सदस्य संख्या किती? - ७५
कोणते मुद्दे निर्णायक?
१. शहरात अनेक भागात अजूनही रस्त्यांची वानवा आहे. झाले त्याची वाट लागली आहे. काही प्रभागात तर वर्षभरातच रस्ता गायब झालेला आहे.
२. भाजप आणि शिंदे सेना मित्र पक्ष असले तरी खरे विरोधकत्यांच्यातच आहेत. नगरपालिका निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात लढले, टोकाचे आरोप झाले. मनपात अजून तरी युती निश्चित नाही.
३. गाळेधोरणाचा तिढा आयुक्तांनी सोडविला, मात्र व्यापाऱ्यांनी त्यास विरोध केला आहे. आमदारांनी हा मुद्दा विधीमंडळात मांडला. मुख्यमंत्र्यांनी नवीन दराचा प्रस्ताव मागविला आहे.
महापालिकेत कुणाची होती सत्ता?
भाजप - ३५
शिंदे गट - २२
ठाकरे गट - १५
एमआयएम - ०३
(गेल्यावेळी निवडणुकीत भाजपला सर्वाधिक ५७ जागा मिळाल्या. त्यानंतर पक्षांतर्गत फूट पडून अशी स्थिती होती.)
मागील निवडणुकीत एकूण मतदार किती ?
एकूण - ३,६५,०१५
पुरुष - १,९३,७१२
महिला - १,७१,६१७
इतर - २६
आता एकूण किती मतदार ?
एकूण - ४,३८,५२३
पुरुष - २,२५,३०८
महिला - २,१३,१७७
इतर - ३८
अनेक इच्छुक कुठे जाणार?
प्रत्येक प्रभागात इच्छुकांची संख्या मोठी आहे. मित्रपक्षामुळे तयारी केलेल्या कार्यकर्त्याची मेहनत पाण्यात जाणार आहे. अशा स्थितीत अनेक इच्छुक अपक्ष वा इतर पक्षांच्या वाटेवर आहेत.