अखेर दोन महिन्यांनंतर तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:20 IST2021-07-07T04:20:39+5:302021-07-07T04:20:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने मे महिन्यात कडक लॉकडाऊन केल्यामुळे, परिणामी मजूर गावाकडे गेल्यामुळे ...

अखेर दोन महिन्यांनंतर तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने मे महिन्यात कडक लॉकडाऊन केल्यामुळे, परिणामी मजूर गावाकडे गेल्यामुळे हे कामदेखील रखडले होते. मात्र, मजूर गावाकडून परतल्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे तब्बल दोन महिन्यांनी तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला पुन्हा सुरुवात करण्यात आली आहे. सध्या रेल्वे प्रशासनातर्फे शिरसोली ते माहेजीदरम्यान सपाटीकरणाचे व पूल, बोगदे उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे गेल्या दोन वर्षांपासून जळगाव ते मनमाडदरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. यातील पहिला टप्पा जळगाव ते शिरसोलीदरम्यान हाती घेण्यात आला असून, या मार्गावर रूळ टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, विद्युतीकरण करणे, सिग्नल यंत्रणा उभारणे आदी तांत्रिक कामे रखडली आहेत. परिणामी, ही महत्त्वाची कामे गेल्या सहा महिन्यांपासून रखडली असल्याने, जळगाव ते शिरसोलीपर्यंतचा पहिल्या टप्प्या पूर्ण होण्यास दिवसेंदिवस विलंब होत आहे. रेल्वे प्रशासनाने मे २०१९ मध्ये पिंप्राळा रेल्वे गेटपासून तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाचा शुभारंभ केला होता. जळगाव ते शिरसोली हा साडे अकरा किलोमीटरपर्यंतचा पहिला टप्पा वर्षभरात पूर्ण करण्याचे नियोजन ठेवले होते. त्यानुसार कामालाही वेगाने सुरुवात करण्यात आली.
मात्र, मार्च २०२० पासून कोरोना संसर्ग सुरू झाल्यानंतर, हे काम सहा महिने बंद होते. त्यानंतर या कामाला सुरुवात झाली खरी; मात्र अधून-मधून लागणाऱ्या लॉकडाऊमुळे मजूर वर्ग गावाकडे परतत असल्यामुळे हे कामही बंद पडत आहे. त्यामुळे दोन वर्षे उलटूनही शिरसोलीपर्यंतचा पहिला टप्पाही पूर्ण न झाल्यामुळे हे काम कधी पूर्ण होणार, असा प्रश्न प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.
इन्फो :
दोन महिन्यांनंतर दुसऱ्या टप्प्याचे काम सुरू
कोरोनामुळे दोन महिन्यांपासून बंद असलेल्या तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली आहे. मात्र, अपूर्ण अवस्थेत असलेले पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण न करता, रेल्वे प्रशासनाने शिरसोली ते माहेजीदरम्यान दुसऱ्या टप्प्याच्या कामाला सुरुवात केली आहे. या ठिकाणी सुरुवातीला जेसीबीच्या साहाय्याने जमीन सपाटीकरणाचे काम करण्यात येत असून, वाटेत असलेल्या लहान-मोठे नाले व नद्यांच्या ठिकाणी पूल व भुयारी बोगदेही उभारण्यात येत आहेत. दरम्यान, हे काम करत असताना, पहिल्या टप्प्यातील रखडलेल्या कामांनाही लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
इन्फो :
कोरोनामुळे मधल्या काळात बंद असलेले तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम, शिरसोलीपासून पुढे पुन्हा सुरू झाले आहे. माहेजीपर्यंत हे काम असणार आहे. तसेच जळगाव ते शिरसोलीदरम्यान अपूर्ण असलेल्या कामालाही लवकरच सुरुवात होणार आहे.
-पकंज डावरे, उपमुख्य अभियंता, भुसावळ रेल्वे विभाग