ओरिएंटमध्ये 'काम बंद'
By Admin | Updated: September 12, 2014 14:46 IST2014-09-12T14:46:46+5:302014-09-12T14:46:46+5:30
नशिराबाद येथील ओरिएंट सिमेंट मधील कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी सहावाजेपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे.

ओरिएंटमध्ये 'काम बंद'
जळगाव : कामगारांच्या मूलभूत मजुरी व ग्रेडेशनमध्ये वाढ करण्यात यावी यासह एकूण २९ मागण्यांसाठी नशिराबाद येथील ओरिएंट सिमेंट मधील कामगारांनी महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सकाळी सहावाजेपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत कामगारांची २९ मागण्यांची सनद मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचा इशारा संघटनेचे उपचिटणीस मुकुंदा रोटे यांनी दिला आहे.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, ओरिएंट सिमेंटचा आंध्रप्रदेशातील देवापूर येथे उत्पादन प्रकल्प असून तेथील कामगारांना विविध सोयी सुविधा पुरविल्या जातात, त्या जळगावातील प्रकल्पात पुरविल्या जात नाही. हा दुजाभाव दूर करण्यात यावा. दरवर्षी पगारात वाढ करण्यात यावी, कामगार मंत्रालयाकडून प्राप्त झालेल्या सूचनांच्या आधारे नियमित महागाई भत्ता देण्यात यावा, घरभाडे, पर्यटन रजा व भत्ता, वैद्यकीय, शैक्षणिक, धुलाई, शिफ्ट आदी भत्ते संघटनेच्या मागणीनुसार देण्यात यावे यासह एकूण २९ मागण्या कामगारांच्या आहेत. दरम्यान, ओरिएंट सिमेंटचे व्यवस्थापक सी.व्ही. बगायत यांना विचारले असता, ते म्हणाले, कामगारांच्या ११ मागण्या आहेत, त्यापैकी आम्ही ४ मागण्या मान्य केल्या आहेत. उर्वरित मागण्यांसाठी कामगारांची आंदोलन सुरू केले आहे. नियमानुसार कामगारांना सोयी-सुविधा देण्यात येत आहे. कामगारांनी काम सुरू करावे.
------------
कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन कंपनीला महिनाभरापूर्वीच देण्यात आले होते. मात्र कोणतीही दखल अथवा चर्चेसाठी बोलाविण्यात न आल्याने ५00 कामगारांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. परिणामी तीनही शिफ्टमधील काम बंद झाले आहे. - मुकुंदा रोटे, उपचिटणीस, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेना.