किनगाव येथे ग्रामीण रुग्णालयाचे काम पूर्णत्वाकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:19 IST2021-09-24T04:19:27+5:302021-09-24T04:19:27+5:30
किनगाव, ता.यावल : गेल्या कित्येक वर्षांपासून मंजूर असलेले किनगाव येथील ग्रामीण रूग्णालयाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी ...

किनगाव येथे ग्रामीण रुग्णालयाचे काम पूर्णत्वाकडे
किनगाव, ता.यावल : गेल्या कित्येक वर्षांपासून मंजूर असलेले किनगाव येथील ग्रामीण रूग्णालयाचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. यासाठी सुसज्ज इमारतीचे बांधकामही बरेचसे झाले आहे.
ग्रामीण रूग्णालयाच्या या कामासाठी १०.२६ कोटी रूपयांची प्रशासकीय मान्यता मिळालेली असून, ७ कोटी ६५ लाख रूपयांची तांत्रिक मान्यता या कामाला आहे. इलेक्ट्रिक टेंडर स्वतंत्र १.५ कोटी रूपयांचे आहे.
३२ गावांना होणार लाभ
किनगावसह ३२ गावांमधील जनतेला या ग्रामीण रूग्णालयाच्या सेवांचा लाभ मिळणार आहे. या रुग्णालय इमारतीच्या बांधकामाच्या प्रत तपासणीबाबत कार्यकारी अभियंता व उपअभियंता जिल्हा परिषद आरोग्य विभाग यांच्यासह कनिष्ठ अभियंता विजय शिंदे हे स्वतः पाहणी करत आहेत.
विविध आजारांसाठी स्वतंत्र डॉक्टर्स
किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागेवर ही भव्य दुमजली इमारत तयार होत आहे. येथे १० प्रकारच्या विविध आजारांवरील उपचारासाठी स्वतंत्र डॉक्टर्स उपलब्ध राहणार आहेत. तर शवविच्छेदनासाठी स्वतंत्र व्यवस्था येथे केली जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानात या कामाला मंजुरी मिळाली आहे व कार्यकारी अभियंता पा. सु. वि. नाशिक परिमंडळ, नाशिक यांच्याकडून ई-टेंडर प्रणाली राबवून सर्वात कमी १४.९९ दराने ही निविदा कमी असलेल्या ठेकेदार एस. ए. कंन्ट्रक्शन, चोपडा यांना हे काम देण्यात आले आहे.
मार्च २०२२पर्यंत काम रुग्णालय सुरु होणार
याठिकाणी प्रसुती विभाग, ऑपरेशन विभाग, पुरूष विभाग, महिला विभाग, लहान मुलांसाठी स्वतंत्र विभाग, एक्स-रे रूम, रक्त साठवण लॅब, पॅथॉलॉजी लॅब, ऑफिस, मिटींग हॉल आदी राहणार असून, इमारत मार्च २०२२पर्यंत जनसेवेसाठी सज्ज होणार आहे.
तर संरक्षक भिंत व रूग्णालयाच्या प्रवेशद्वारासाठी स्वतंत्र निधी मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करावा व या ग्रामीण रूग्णालयाला बऱ्हाणपूर - अंकलेश्वर महामार्गालगत रस्ता मिळावा, यासाठीही प्रयत्न करावा, अशी मागणी परिसरातून होत आहे.
हे ग्रामीण रुग्णालय सुरू झाल्यास साकळी-दहिगाव जिल्हा परिषद गट व किनगाव डाभुर्णी गटातील जनतेला मोठ्या प्रमाणात आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत. गेल्या वीस वर्षांपासून किनगाव परिसरात एखादा अपघात झाल्यास किंवा मृत्यू झाल्यास अपघातग्रस्ताला यावल ग्रामीण रुग्णालयात न्यावे लागत होते. किनगाव ग्रामीण रुग्णालयासाठी माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, आमदार लता सोनवणे यांच्या प्रयत्नातून निधी मंजूर झाला आहे. दरम्यान, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या निवासस्थानाचे काम स्वतंत्रपणे सुरू आहे. हे ग्रामीण रुग्णालय मार्च अखेरीस पूर्णत्वास गेल्यास परिसरातील किनगाव, नायगाव, चिंचोली, डाभुर्णी, आडगाव कासारखेडा, दोनगाव, उंटावड, वाघोडा, गिरडगाव, कोळन्हावी तसेच १०० टक्के आदिवासी असलेली गावे मालोद, इचखेदा, मानापुरी, गाडऱ्या, जामन्या, उसमळी, लंगडा आंबा, लसून बर्डी, वाघाझिरा या परिसरातील जनतेला आरोग्यसेवेचा लाभ मिळेल.
किनगाव येथील नियोजित ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीचे सुरु असलेले बांधकाम ( छाया : आर. ई. पाटील )