महिनाभरात पिंप्राळा उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होणार ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:02 IST2021-02-05T06:02:05+5:302021-02-05T06:02:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील पिंप्राळा रेल्वेगेटवर तयार होणाऱ्या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामाबाबत गुरुवारी महारेलची महाराष्ट्राचे प्रकल्प मॅनेजर विकास ...

महिनाभरात पिंप्राळा उड्डाणपुलाच्या कामाला सुरुवात होणार ?
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातील पिंप्राळा रेल्वेगेटवर तयार होणाऱ्या प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामाबाबत गुरुवारी महारेलची महाराष्ट्राचे प्रकल्प मॅनेजर विकास दत्ता यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पुलालगत तयार होणाऱ्या आर्मसाठी मनपाने आठवडाभरात मालमत्तांचे मूल्यांकन करून, जागा संपादित करण्याचा सूचना दत्ता यांनी दिल्या आहेत. तसेच हे काम झाल्यानंतर महिनाभरातच कामाला सुरुवात करण्यावर ‘महारेल’ चा भर असेल, अशी माहिती दत्ता यांनी दिली.
गुरुवारी दुपारी ४ वाजता विकास दत्ता यांच्यासह उपमहापौर सुनील खडके, नगरसेविका ॲड.शुचिता हाडा, नगरसेवक अमित काळे, मनोज काळे यांच्यासह मनपा शहर अभियंता अरविंद भोसले, समीर बोरोले यांच्यासह मनपाचे अधिकारीदेखील उपस्थित होते. अनेक महिन्यांपासून भोईटे नगरकडून या पुलाला आर्म जोडण्याच्या मागणीसाठी हे सुरू होवू शकले नव्हते. महासभेने या आर्मला मंजुरी दिल्यानंतर आता पुलाच्या कामाला सुरुवात करण्यासाठीच्या हालचालींना वेग आला आहे. गुरुवारी महारेलच्या अधिकाऱ्यांनी मनपा अभियंत्यांच्या उपस्थितीत आर्मच्या जागेची पाहणी केली. यामुळे भोईटे नगरातील तीन मालमत्ता बाधित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही जागा संपादित करण्यासाठी मूल्यांकनाचे काम शुक्रवारपासूनच सुरुवात करण्याचे आदेश ‘महारेल’ च्या अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
आता काम थांबवू शकत नाही
आर्मच्या फेऱ्यामुळे हे काम आधीच वर्षभरापासून रखडले आहे. ‘महारेल’ कडून या पुलाचे काम होणार आहे. मात्र, आर्ममुळे कामाला सुरुवात झालेली नाही. आता मनपासह रेल्वेनेदेखील आर्मला मंजुरी दिल्याने, तत्काळ जागा संपादित करण्याचे काम मनपाने केले पाहिजे. आधीच पुलाच्या कामाला उशीर झाला असून, आता काम थांबवू शकत नाही, असेही रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मनपा प्रशासनाने आता त्यांच्याकडील कामांचे नियोजन पूर्ण करावे, अशाही सूचना रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.