महिलांची दारूबंदी, तर पुरुषांची वाळूबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:16 IST2021-09-03T04:16:39+5:302021-09-03T04:16:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथे तब्बल दीड वर्षाच्या खंडानंतर झालेल्या महिलांच्या ग्रामसभेत दारूबंदी, तर सर्वसाधारण ग्रामसभेत ...

महिलांची दारूबंदी, तर पुरुषांची वाळूबंदी
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : तालुक्यातील मांडळ येथे तब्बल दीड वर्षाच्या खंडानंतर झालेल्या महिलांच्या ग्रामसभेत दारूबंदी, तर सर्वसाधारण ग्रामसभेत वाळूबंदी करण्यात आली.
कोरोनामुळे ग्रामीण भागात ग्रामसभा घेण्यासदेखील बंदी होती. ग्रामस्थांना तक्रारीदेखील करता येत नव्हत्या, तसेच उपोषण, आंदोलनेही करता येत नव्हती. त्यामुळे अवैध दारू विक्री, अवैध वाळू विक्री फोफावली होती. कोरोनाचे नियम शिथिल होताच दीड वर्षानंतर ग्रामसभा घेण्यास परवानगी मिळताच मांडळ येथे आधी महिलांची ग्रामसभा घेण्यात आली. या ग्रामसभेस सरपंच विद्याबाई पाटील, उपसरपंच हंसराज भील, सदस्य सुदर्शन पवार, विजय कोळी, दीपक पाटील, मंगलदास कांबळे, कल्पनाबाई पाटील, कुसुमबाई पाटील, मीनल कोळी, कविता बडगुजर, सुरेखा पाटील, वेणूबाई भील, सुमनबाई पारधी, ग्रामसेवक ज्ञानेश्वर पाटील, लिपिक अशोक कोळी हजर होते.
यावेळी संगीताबाई कोळी, सुरेखा कोळी, रत्नाबाई कोळी, भुराबाई कोळी, सुनंदाबाई पारधी या महिलांनी गावात दारूबंदी झालीच पाहिजे, अशी मागणी केली. दारूबंदी विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही बेकायदेशीर दारू विक्रीला आळा घातला जात नाही, नवरा दारू पिऊन आल्यावर भांडणे होतात, कोणाचा नवरा दारूत मेला, तर कोणाचा मुलगा दारू पितो, तरुण पिढी बिघडत चालली आहे, दारूमुळे गावात भांडणे होतात आदी मुद्दे उपस्थित करून दारूबंदीचा ठराव करण्यास भाग पाडले.
सर्वसाधारण सभेत महसूल विभागाने काढलेला वाळू लिलाव गट रद्द करून गावातून वाळू बंदी करावी, अशी मागणी पुरुषांनी लावून धरली. काही दिवसांपूर्वी वाळूमुळे दंगल घडली होती. त्यामुळे वाळूबंदीचा ठरावही मंजूर करण्यात आला, तसेच गेल्या अनेक दिवसांपासून घरकुल मिळत नसल्याची तक्रारदेखील ग्रामसभेत करण्यात आली.
ग्रामसभेत झालेले ठराव विविध विभागांना पाठवण्यात येतील, अशी माहिती ग्रामसेवक ज्ञानेश्वर पाटील यांनी दिली.
ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी डॉ. अशोक पाटील होते. यावेळी नारायण कोळी, किरण जैन, बाळासाहेब पवार, विजय पाटील, सुरेश कोळी, राजू धनगर, रमेश पाटील, संतोष कोळी, संतोष पाटील, रोहित पाटील, सुरेश कांबळे हजर होते.