अंगावर इलेक्ट्रीक खांब पडून वायरमनचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2020 22:44 IST2020-08-23T22:44:49+5:302020-08-23T22:44:57+5:30
राजवडची घटना : जीर्ण खांबावर सुरू होते काम

अंगावर इलेक्ट्रीक खांब पडून वायरमनचा मृत्यू
पारोळा :पारोळा तालुक्यातील राजवड येथे रविवारी दुपारच्या सुमारास गावात सिमेंटच्या खांबावर इलेक्ट्रिक काम करत असताना खांब अचानक तुटून पडल्याने त्या खाली येऊन नीलेश गोपाल पाटील (२१) या कंत्राटी वायरमनचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
रविवारी राजवड ता. पारोळा गावात इलेक्ट्रीकचे काम सुरू होते. वायरमन नरेंद्र शिंदे व कंत्राटीबेसवर वायरमन म्हणून काम करणारे निलेश गोपाल पाटील रा. लष्कर गल्ली पारोळा हे दोघे या ठिकाणी काम करत होते. दुपारी बारा वाजेच्या सुमारास एका इलेक्ट्रिक सिमेंटच्या खांबावर काम करण्यासाठी निलेश वर चढला असता खांब अतिशय जीर्ण व जुना असल्याने अचानक तुटला. यात निलेश खाली पडला व खांब त्याच्या अंगावर पडल्याने निलेश याच्या डोक्याला जबर मार लागला. डोक्यातून मोठ्या प्रमाणात रक्त वाहत होते.
घटनास्थळी अनेकांनी धाव घेऊन त्याला लगेच अमळनेर येथे एका खाजगी इस्पितळात दाखल करण्यात आले. तेथे त्यांचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.