२५ किमी वेगाने वाहत राहिले वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:17 IST2021-05-18T04:17:36+5:302021-05-18T04:17:36+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळामुळे जिल्ह्यात रविवारी पावसाने हजेरी लावली असली, तरी सोमवारी ...

२५ किमी वेगाने वाहत राहिले वारे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळामुळे जिल्ह्यात रविवारी पावसाने हजेरी लावली असली, तरी सोमवारी मात्र या वादळाचा जिल्ह्यावर फारसा परिणाम जाणवला नाही. मात्र दिवसभर या वादळामुळे जिल्हा देखील २५ किमी वेगाने वारे वाहत होते. तसेच शहरात काहीसे ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने तापमानात देखील घट झाली होती. शहराचे तापमान दोन दिवसांपासून ३९ अंशांपर्यंत खाली आल्याने नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
जळगाव शहरासह तालुक्यात रविवारी झालेल्या वादळी पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता. सोमवारी देखील महावितरण कडून दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आल्यामुळे जळगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये सकाळपासूनच वीज पुरवठा खंडित झाला होता. तर जळगाव शहरात देखील दिवसभर विजेचा लपंडाव सुरू होता. दरम्यान जळगाव तालुक्यात दिवसभर २५ किमी वेगाने वारे वाहत असल्याने केळीच्या कांदे बागाचे पाने फाटल्याने केळीचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे. पाने फाटल्यामुळे केळीच्या आवश्यक वाढीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, दक्षिण- पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ‘तौत्के’ चक्रीवादळाने आपला पुढील प्रवास गुजरातच्या दिशेने वळवला असला तरी या वादळामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात येत्या चार ते पाच दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.