काम मिळेल का काम? १७ हजारांवर बेरोजगारांची हाक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:21 IST2021-09-07T04:21:56+5:302021-09-07T04:21:56+5:30
विजयकुमार सैतवाल लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आता रोजगाराच्याही संधी उपलब्ध होणार असल्याच्या आशेने रोजगारासाठी ...

काम मिळेल का काम? १७ हजारांवर बेरोजगारांची हाक !
विजयकुमार सैतवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा संसर्ग कमी झाल्याने आता रोजगाराच्याही संधी उपलब्ध होणार असल्याच्या आशेने रोजगारासाठी तरुण-तरुणींकडून अर्ज केले जात आहे. यात जानेवारी ते ऑगस्ट २०२१ या आठ महिन्यांत १७ हजार ६६३ जणांनी अर्ज केले असून, एप्रिलपासून ऑगस्ट महिन्यापर्यंत १३६ जण कामावर रुजू झाले आहेत.
गेल्या वर्षी कोरोनाचा संसर्ग पसरला आणि अनेकांचा रोजगार गेला. यात मुंबई, पुणेसह इतरही मोठ्या शहरातील अनेक जण रोजगार गेल्याने गावाकडे परतले. त्यामुळे रोजगाराचा मोठा प्रश्न गेल्या दीड वर्षापासून उभा राहिला आहे.
आता कोरोनाचा संसर्ग कमी होऊन निर्बंध शिथिल झाल्याने रोजगारही उपलब्ध होण्याचे संकेत दिले जात आहे. त्यामुळे तरुण-तरुणी रोजगारासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे अर्ज करीत आहेत. जून महिन्यापासून काहीसे निर्बंध शिथिल झाले व अर्जांचीही संख्या वाढू लागली. जून महिन्यात दोन हजार ७९१ अर्ज दाखल झाल्यानंतर जुलै व ऑगस्टमध्ये ही संख्या आणखी वाढत गेली.
२२७ जणांची निवड
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे अर्ज दाखल झाल्यानंतर केंद्राच्या वतीने रोजगार मेळावेदेखील घेण्यात आले. त्यात दोन हजार १२६ जणांच्या मुलाखती घेण्यात आल्या. त्यानंतर २२७ जणांची अंतिम निवड करण्यात आली व १३६ जण प्रत्यक्ष रुजूदेखील झाले आहे.
सुरत, नाशिकला अधिक संधी
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राकडे अर्ज केल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी रोजगाराच्या संधी दिल्या जात आहे. त्यात सुरत, नाशिक येथील कंपन्यांकडून अधिक विचारणा होते व तेथे रोजगाराच्या संधी अधिक उपलब्ध होत असल्याची माहिती देण्यात आली. जळगावातही रोजगार मिळत असून, पुढील महिन्यापासून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
चांगला प्रतिसाद
कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर अनेक जण नोकरी शोधत असून, त्यासाठी अर्जदेखील करीत आहे. नोंदणीस चांगला प्रतिसाद असून, रोजगार मेळावे घेऊन त्यांना रोजगारदेखील दिला जात आहे. पुढील महिन्यापासून ही संख्या आणखी वाढू शकते.
- राजपाल कोल्हे, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग