आयटीआयला प्रवेश मिळेल का रे भाऊ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:16 IST2021-07-29T04:16:49+5:302021-07-29T04:16:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : दहावीच्या निकालापूर्वीच आयटीआयची प्रवेश प्रक्रिया प्रारंभ झाली होती. प्रक्रियेत आता विकल्पही भरता येत ...

Will ITI get admission, brother? | आयटीआयला प्रवेश मिळेल का रे भाऊ?

आयटीआयला प्रवेश मिळेल का रे भाऊ?

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : दहावीच्या निकालापूर्वीच आयटीआयची प्रवेश प्रक्रिया प्रारंभ झाली होती. प्रक्रियेत आता विकल्पही भरता येत आहेत. प्रक्रिया कधीपर्यंत सुरू राहील, हे अद्याप स्पष्ट नसले, तरी दहावीचा वाढलेला निकाल, विशेष प्रावीण्य श्रेणीत सर्वाधिक विद्यार्थी असल्याने आयटीआय प्रवेशासाठी शासकीय व खाजगी संस्थेत एकेका जागेसाठी गुणवंत विद्यार्थ्यांची चुरस पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे ३० संस्थांतील ३ हजार जागांत प्रवेश मिळेल का रे भाऊ, अशी विचारणा विद्यार्थ्यांतून होत आहे.

महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने शासकीय, खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांत राज्यात शासकीय आणि खासगी, अशा ९६६ आयटीआयमध्ये केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. या आयटीआयमध्ये १ लाख ३६ हजार जागा असून, आतापर्यंत ६१ हजार ७२६ विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. आवडत्या ट्रेड आणि आयटीआयसाठी विकल्प अर्ज भरण्याची प्रक्रियादेखील सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील सुमारे तीन हजार जागांसाठी आयटीआयची प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. आतापर्यंत ३ हजार ६३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून, त्यापैकी ३ हजार २७१ विद्यार्थ्यांनी अर्ज निश्चित करून शुल्कही भरले आहे. विविध कोर्सेसच्या प्रवेशाच्या माहितीसाठी विद्यार्थ्यांना संबंधित महाविद्यालयांच्या वेबसाइटवर संपर्क उपलब्ध करून देण्यात आला आहे.

--

जिल्ह्यातील संस्था

शासकीय - १५

खाजगी - १५

--

जिल्ह्यातील जागा

शासकीय - १,७०० (सुमारे)

खाजगी - १,३०० (सुमारे)

---

अर्जांची स्थिती

विद्यार्थ्यांची नोंदणी - ३ हजार ६३७

कन्फर्म झालेले अर्ज - ३ हजार २७१

---

विद्यार्थ्यांना समन्वयकांकडून मार्गदर्शन

- आयटीआयकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी समन्वयकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

- गतवर्षी मराठा आरक्षणामुळे आयटीआयची प्रवेश प्रक्रिया लांबली होती. यंदा अजून वेळापत्रक जाहीर झालेले नाही.

- मागील वर्षी जिल्ह्यातील हातावर मोजण्याइतक्याच जागा रिक्त राहिल्या होत्या.

----

फिटर, इलेक्ट्रिशियन, मेकॅनिकलकडे ओढा

- इलेक्ट्रिशियन, मेकॅनिकलकडे विद्यार्थ्यांचा स्वयंरोजगाराच्या दृष्टीने ओढा असतो.

- मशिनिस्ट, इलेक्ट्रॉनिक्स, फिटर या ट्रेडला औद्योगिक क्षेत्रातून जास्त मागणी असते.

- खाजगीपेक्षा शासकीय आयटीआय संस्थांना विद्यार्थी प्राधान्य देतात, तर नोकरी व्यवसाय करताना खाजगीतून आयटीआयतून प्रमाणपत्र मिळवून घेण्याचाही ट्रेंड आहे.

- गेल्या काही वर्षांपासून आयटीआयकडे विद्यार्थ्यांचा अधिक कल असल्याचेही पाहायला मिळत आहे.

---

विद्यार्थी म्हणतात...

दहावीला गुण चांगले मिळाले आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिशियन किंवा फिटर ट्रेड प्रवेश मिळण्यासाठी प्रयत्न आहे; परंतु प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन असल्याने प्रक्रिया कधी संपणार, याकडे लक्ष लागले आहे.

-सौरभ कोळी, विद्यार्थी

---

आवडीचा ट्रेड मिळेल की नाही शंकाच आहे. मात्र, आठवडाभराआधी अर्ज दाखल केला आहे. ही प्रक्रिया कुठपर्यंत सुरू राहील, हे सांगता येत नाही. हवा तो ट्रेड मिळाला तर छानच आहे.

-कामिनी पाटील, विद्यार्थिनी

Web Title: Will ITI get admission, brother?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.