शिक्षकदिनी गुरु-शिष्यांची भेट होणार का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:36 IST2021-09-02T04:36:43+5:302021-09-02T04:36:43+5:30
एरंडोल : कोरोनाच्या महामारीमुळे इतर ठिकाणांप्रमाणेच तालुक्यातील शाळा व महाविद्यालये अल्पसा कालावधीवगळता जवळपास दीड वर्षापासून बंद आहेत. ...

शिक्षकदिनी गुरु-शिष्यांची भेट होणार का?
एरंडोल : कोरोनाच्या महामारीमुळे इतर ठिकाणांप्रमाणेच तालुक्यातील शाळा व महाविद्यालये अल्पसा कालावधीवगळता जवळपास दीड वर्षापासून बंद आहेत. त्यामुळे शिक्षण क्षेत्राचा खेळखंडोबा झाला आहे. एवढ्या प्रदीर्घ सुटीमुळे विद्यार्थी कंटाळले आहेत. तसेच शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते धोक्यात आले आहे. शाळा व महाविद्यालय या प्रणालींचा विद्यार्थ्यांना विसर पडला आहे असे बोलले जाते. ज्ञान मिळवण्यासाठी शाळा- महाविद्यालयाबाहेर अनेक पर्याय असले तरी संस्कार हा फक्त शाळा-महाविद्यालयातच मिळतो म्हणून ५ सप्टेंबर या शिक्षकदिनी शाळा-महाविद्यालय सुरू होणार का शिक्षण संस्थांची घंटा पूर्ववत वाजणार का याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.
एरंडोल तालुक्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची संख्या ८४ असून, खासगी अनुदानित प्राथमिक शाळा पाच आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांची संख्या १३ व विनाअनुदानित शाळांची संख्या आठ आहे. माध्यमिक शाळा ३५ आहेत, तर डीडीएसपी महाविद्यालय हे एकमेव महाविद्यालय आहे. कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता विचारात घेऊन शासनाने सर्व संस्था बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. मध्यंतरी आठवी ते दहावीचे वर्ग सुरू होते. मात्र वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन पुन्हा ते वर्ग बंद करण्यात आले. एरंडोल तालुक्यातील जवळपास तीस हजार विद्यार्थी शाळा- महाविद्यालय कधी सुरू होणार याची प्रतीक्षा करीत आहेत. मोबाइलवरील चालणारे आभासी शिक्षण हे ग्रामीण भागाला न रुचणारे व न पेलवणारे आहे खूप मोठा टक्का शिक्षणापासून या दीड वर्षाच्या कालावधीत वंचित राहिला आहे, त्यामुळे ज्ञानाच्या कक्षा रुंदावल्या नाहीत तर येणारी भावी पिढी स्पर्धेच्या युगात कशी तग धरणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शासनाने आतातरी पालक व विद्यार्थी या घटकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये, अशी भावना निर्माण झाली आहे.
शाळांच्या खोल्यांचे निर्जंतुकीकरण करून तसेच सर्व शिक्षक, प्राध्यापक व कर्मचारी यांचे १०० टक्के लसीकरण करून सॅनिटायझर व मास्कचा वापर इत्यादी निर्बंध घालून कोरोना नियमांचे पालन करण्याच्या अटींवर शाळा-महाविद्यालय शिक्षक दिनाच्या पवित्र दिवशी सुरू करावेत, अशी मागणी जोर धरत आहे.