वादावादी टाळून शहराच्या विकास होणार का ..?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:27 IST2021-05-05T04:27:35+5:302021-05-05T04:27:35+5:30
महापालिकेत ऐतिहासिक सत्तांतर होऊन आता दोन महिन्याचा काळ पूर्ण झाला आहे. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने महापालिकेची सर्व यंत्रणा व ...

वादावादी टाळून शहराच्या विकास होणार का ..?
महापालिकेत ऐतिहासिक सत्तांतर होऊन आता दोन महिन्याचा काळ पूर्ण झाला आहे. सध्या कोरोनाची परिस्थिती असल्याने महापालिकेची सर्व यंत्रणा व मनपा सर्व पदाधिकारी देखील कोरोना वरील उपाय योजनांमध्ये गुंतलेले आहेत. या भयावह परिस्थितीत महापालिका व जळगाव शहराच्या दृष्टीने महत्त्वाची बाब म्हणजे महापालिकेला जिल्हा नियोजन समितीमधून ६१ कोटी रुपयांचा निधी जाहीर झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागले आहे. रस्त्यांची भीषण परिस्थिती मुळे शहराची अक्षरशा वाट लागली आहेत. त्यात महापालिकेला प्राप्त शंभर कोटी रुपयांच्या निधीतून कोणतेही काम नव्हता त्या निधीवर राज्य शासनाने स्थगिती आणली आहे. अशा परिस्थितीत माजी महापौर भारती सोनवणे व विद्यमान महापौर जयश्री महाजन व शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कडून जिल्हा नियोजन समितीतून ६१ कोटी रुपयांचा निधी महापालिकेसाठी प्राप्त झाला आहे. शहरवासीयांच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब असली तरी हा निधी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा भाजप व शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. याआधी भाजपाची सत्ता असताना देखील दोन्ही पक्षात अशाच प्रकारे तू तू मे मे सुरूच होती. दोन्ही पक्षांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीना जळगावकर अक्षरशः कंटाळले आहेत. पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यावर आरोप केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपाने देखील विद्यमान पालकमंत्र्यांवर आरोप केले. दोन्ही पक्षात अशाच प्रकारे आरोप-प्रत्यारोप अजूनही कायम आहेत. मात्र या आरोप-प्रत्यारोपांमध्ये जळगावकरांना काय मिळणार आहे. याबाबत या दोन्ही पक्षांनी विचार करण्याची गरज आहे. दोन्हीही पक्षांनी आपापसातील गट-तट व वाद सोडून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. शहरातील रस्त्यांची परिस्थिती पाहता जळगावकर दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांवर सारखेच नाराज आहेत. अशा परिस्थितीत मनपातील सत्ताधारी व विरोधी बनलेल्या भाजपला देखील आता काही महिने का असेना शिवसेनेला काम करण्याची संधी देणे गरजेचे आहे. कारण अडीच वर्षात सत्ताधारी म्हणून भाजपला कोणतेही ठोस काम करता आले नाही. त्यात राज्य शासनाकडून प्राप्त झालेला शंभर कोटी रुपयांच्या निधीचे नियोजन देखील सत्ताधाऱ्यांना त्यावेळी करता आले नव्हते. त्यामुळे विरोधी बनलेल्या भाजपने काम करण्यासाठी शिवसेनेला काही अवधी देण्याची गरज आहे. त्यानंतर कामे झाली प्रखर विरोधी पक्ष म्हणून भाजपने आपली भूमिका पार पाडली पाहिजे. मात्र संपूर्ण शहर आधीच समस्यांनी ग्रासले आहे. त्यात कोरोना ची भयंकर परिस्थिती असताना दोन्ही पक्षाचे पदाधिकारी जर राजकीय हेवेदाव्यांमध्ये गुंतलेले असले, तर यामध्ये या दोन्ही पक्षांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे प्राप्त निधीतून शहराच्या विकासासाठी कसा सुवर्णमध्य निघेल याचा विचार करून मनपा सत्ताधारी शिवसेना व विरोधी पक्ष असलेल्या भाजपाला काही महिने तरी काम करावे लागेल.