पत्नी व मुलाच्या मृत्यूचे बँकेतून पैसे काढण्यासाठी दुचाकीवर नेले अन् गळा दाबून ठार मारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:26 IST2020-12-05T04:26:02+5:302020-12-05T04:26:02+5:30
जळगाव : अपघातात ठार झालेल्या पत्नी व मुलाचे बँकेत पैसे आलेले असल्याचे सांगून मेहुण्याला दुचाकीवर बसवून नेले व नंतर ...

पत्नी व मुलाच्या मृत्यूचे बँकेतून पैसे काढण्यासाठी दुचाकीवर नेले अन् गळा दाबून ठार मारले
जळगाव : अपघातात ठार झालेल्या पत्नी व मुलाचे बँकेत पैसे आलेले असल्याचे सांगून मेहुण्याला दुचाकीवर बसवून नेले व नंतर त्याचा गळा दाबून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणात शालक रमेश रामदास पवार (२९, रा.कंडारी, ता.भुसावळ) व शालक सुनील ज्ञानेश्वर गायकवाड (२२, रा.कोथळी, ता.मोताळा) या दोघांना भुसावळ शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने राबविलेल्या संयुक्त मोहीमेतून अटक करण्यात आली आहे. बहिणी व भाचा यांच्या अपघाताला मेहुणाच जबाबदार होता, म्हणून त्याचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली आहे. राजू श्यामराव मिरटकर (रा.खरबडी मोताळा, जि.बुलडाणा) याचा खून झाला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिम जिल्ह्यातील पिंपळगाव राजा येथे राजू श्यामराव मिरटक याच्या दुचाकीला मे महिन्यात अपघात झाला होता. त्यात त्याची पत्नी व मुलगा यांचा मृत्यू झाला होता. या धक्क्यातून सावरल्यानंतर राजू हा भुसावळ येथे बहिण सुनीता युवराज पवार हिच्याकडे आला होता. ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजता नातेवाईक रमेश रामदास पवार हा घरी आला व राजूच्या पत्नी व मुलाच्या अपघाती मृत्यूचे बँकेत पैसे आलेले आहेत त्यासाठी राजू याला मोताळा येथे घेऊन जात असल्याचे सांगून त्यादिवशी दुचाकीवर बसवून राजूला घेऊन गेला. राजू घरी न आल्याने सर्वत्र शोधाशोध झाली तर रमेश पवार देखील त्यादिवसापासून गायब झाला. या प्रकरणात संशय आल्यानंतर सुनीता पवार हिने २० नोव्हेंबर रोजी भुसावळ शहर पोलीस स्टेशन गाठून भावाचे अपहरण केल्याची तक्रार दिली.
कुजलेला मृतदेह आढळल्याने उघड झाली घटना
बोराखडी,जि.बुलडाणा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा कुजलेला मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. दुसरीकडे भुसावळ शहर व स्थानिक गुन्हे शाखेकडून तांत्रिक मुद्यावरुन तपासाला सुरुवात केली असता त्यात यश आले. घटनास्थळावर सुनील गायकवाड व रमेश पवार हे असल्याचे उघड झाल्यानंतर सुनील गायकवाड याला पोलिसांनी ताब्यात घेवून पोलीसी खाक्या दाखविला असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. बहिण व भाच्याच्या अपघात व मृत्यूला मेहुणा जबाबदार असल्याने त्याचा बदला म्हणून मेहुण्यालाही गळा दाबून संपविल्याची कबुली त्याने दिली. त्यानंतर रमेश यालाही अटक करण्यात आली.
या पथकाने उघड केला गुन्हा
भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, सहायक निरीक्षक संदीप दुनगडू, उपनिरीक्षक रवींद्र गिरासे, सहायक फौजदार विजय पाटील, नरेंद्र वारुळे, दिनेश बडगुजर, समाधान पाटील, मोहन पाटील व जितेंद्र चौधरी यांनी हा गुन्हा उघडकीस आणला.