‘लोकमत’वाले कोण आहेत? लक्ष द्या... प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:29 IST2021-03-04T04:29:15+5:302021-03-04T04:29:15+5:30
गणेश कॉलनीतील विजय कॉलनीत शासकीय आशादीप महिला वसतिगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस ...

‘लोकमत’वाले कोण आहेत? लक्ष द्या... प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय!
गणेश कॉलनीतील विजय कॉलनीत शासकीय आशादीप महिला वसतिगृहात मुलींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी उघडकीस आला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रांताधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमली. बुधवारी सकाळी ११ वाजता प्रांताधिकारी धोडमिसे, जिल्हा पेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक विलास शेंडे, सहायक निरीक्षक महेंद्र वाघमारे, महिला उपनिरीक्षक कांचन काळे आदी जण वसतिगृहात दाखल झाले. त्यानंतर भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ, सामाजिक कार्यकर्त्या सरिता नेरकर आदींनीही वसतिगृहात येऊन महिला अधिकारी, कर्मचारी तसेच वसतिगृहातील महिला व मुली यांच्याशी चर्चा करून नेमका काय प्रकार आहेत? याची माहिती जाणून घेतली.
संस्थेकडून माहिती दडविण्याचा प्रयत्न
प्रांताधिकाऱ्यांची समिती चौकशी करीत असतानाच ज्या मुलीने कपडे काढून नृत्य करायला भाग पाडले जाते, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्त्यांकडे केली होती, त्याच मुलीने बुधवारीही समितीसमोरच पत्रकारांशी बोलण्याचा प्रयत्न केला. मला बोलू द्या म्हणून ती सांगत होती, परंतु तिला बोलू दिले जात नव्हते. दुपारी साडेबारा वाजता वरच्या मजल्यावरील खिडकीतूनच या मुलीने ‘लोकमत’वाले कोण आहेत, हे बघा इथे सगळं दाबादाबी सुरू आहे अशी ती ओरडून बोलली. ‘लोकमत’ प्रतिनिधीने बोला असे म्हणताच या मुलीला काही जणांनी खिडकीतून आतमध्ये ओढले. दोन वेळा या मुलीने पत्रकारांशी बोलण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटपर्यंत तिला बोलू दिले नाही.