कुजबूज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:22 IST2021-09-09T04:22:23+5:302021-09-09T04:22:23+5:30
जळगाव : सध्या शासनाकडून अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या होत आहेत. त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेतही गेल्या पंधरा दिवसांत अनेक ...

कुजबूज
जळगाव : सध्या शासनाकडून अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या होत आहेत. त्यानुसार जळगाव जिल्हा परिषदेतही गेल्या पंधरा दिवसांत अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून, हे अधिकारी लवकरच पदभार सोडून नियुक्तीच्या ठिकाणी रुजू होणार आहेत. मात्र, साहेब गेल्यानंतर आपले बिलांचे कसे होणार, निवडणूका जवळ येत आहेत, या भीतीपोटी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांची जिल्हा परिषदेत चांगलीच वर्दळ वाढली आहे. परवा, काही पदाधिकारी जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्यांच्या दालनात तासभर ठाण मांडून बसले. साहेबांना त्यांनी कामच उमजू दिले नाही, साहेब, साहेब करीत साहेबांना चांगलेच झाडावर बसवले, विशेष म्हणजे जाता-जाता आमचे कामही करून जा, असा नवसही केला. पदाधिकाऱ्यांच्या या बोलण्यानंतर साहेबही काहीशी मिस्कील हास्य करत, म्हणजे काय हो.. अहो म्हणजे आमच्या कामांची तेवढी बिले काढा हो, ठेकेदारांचे पैसे द्यायचे आहेत, निवडणुका तोंडावर येत आहेत, बिले अडकल्यामुळे आम्हाला काही उमजत नाही, प्लीज तेवढे बघा.. तुम्हाला वेळ नाही आणि साहेब लक्ष द्यायला तयार नाही, आम्ही काय करायचे असे म्हणत, या अधिकाऱ्यांना तासभर बिलांच्या मागणीसाठी अधिकाऱ्यांचा पिछ्छाच सोडला नाही..शेवटी साहेबही मिटींग असल्याचे सांगत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले..
-सचिन देव