जळगाव : चोपडा येथे बहिणीला भेटून घरी परत येत असताना समोरुन येणारी चारचाकी दुचाकीवर धडकल्याने हर्षल भिका पाटील (वय १९) हा जागीच ठार झाला तर नितीन निंबा भील (वय २३) याचा रुग्णालयात मृत्यू झाला. ऋषीकेश छाटू पाटील (वय २१, तिघं रा.वाघळूद, ता.धरणगाव) हा तरुण जखमी झाला. हा अपघात शनिवारी दुपारी तीन वाजता वेले, ता.चोपडा गावाजवळ झाला.
वाघळूद येथील हर्षल, नितीन व ऋषीकेश हे तिघं मित्र होते. ऋषीकेशची बहिण चोपडा येथे असल्याने तिला भेटण्यासाठी तिघं जण शनिवारी सकाळी दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.सी.७८०४) गेले होते. तेथून परत येत असताना वेले, ता.चोपडा गावाजवळ समोरुन येणाऱ्या चारचाकीने (क्र.एम.एच.१८ ए.बी.२३०३) दुचाकीला धडक दिली. दोन्ही वाहने वेगात असल्याने दुचाकीवरील तिघं जण लांब फेकले गेले. नितीन याच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर हर्षल व ऋषीकेश या दोघांना जखमी अवस्थेत चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने हर्षल याला जळगाव येथे जिल्हा रुग्णालयात हलविले, मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात वैद्यकिय अधिकारी डॉ.सचिन अहिरे यांनी त्यास मृत घोषीत केले. ऋषीकेश याच्यावर चोपड्यात उपचार सुरु असून त्याचे दोन्ही हात फ्रॅक्चर असल्याचे सांगण्यात आले.
तिघंही एकुलते; नितीनचे दोन महिन्यापूर्वीच झाले लग्नहर्षल, नितीन व ऋषीकेश हे तिघं आपआपल्या कुटुंबात एकुलते होते. नितीन याचे दोन महिन्यापूर्वीच लग्न झाले होते तर हर्षल व ऋषीकेश हे अविवाहित असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली. तिघांचे आई, वडील मजुरी करुन उदरनिर्वाह भागवितात. हर्षलच्या मृत्यूची बातमी समजताच जळगावातील नातेवाईक व गावावरुन वडील व इतरांनी धाव घेतली. आत्या व वडीलांचा आक्रोश मन हेलावणारा होता.