मतीमंद मुलीवर अत्याचार होत असताना बाहेर महिलेनेच दिला पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 04:20 IST2021-02-27T04:20:43+5:302021-02-27T04:20:43+5:30
जळगाव : शेतात २० वर्षीय मतिमंद मुलीवर अत्याचार होत असताना खोलीच्या बाहेर महिलेनेच पहारा देऊन या घटनेला प्रोत्साहन दिल्याचा ...

मतीमंद मुलीवर अत्याचार होत असताना बाहेर महिलेनेच दिला पहारा
जळगाव : शेतात २० वर्षीय मतिमंद मुलीवर अत्याचार होत असताना खोलीच्या बाहेर महिलेनेच पहारा देऊन या घटनेला प्रोत्साहन दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या अत्याचारातून पीडितेने बाळालाही जन्म दिला आहे. दरम्यान, याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात महिलेसह सहा जणांविरुध्द बलात्कार व ॲट्रासिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील निंबा त्र्यंबक सावळे (४०), शिवाजी देवचंद शिंदे (५८), गोपाल बाजीराव पाटील (३५) व संजय उर्फ बापू वालजी आढाव (४२, सर्व रा.पिंपळगाव हरे.) यांना अटक करण्यात आली असून नीलेश नावाचा व्यक्ती व समिनाबाई लुकमान तडवी हे दोघं जण फरार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोपाल पाटील याच्या शेतात मागील काही दिवसात वरिल पाच जणांनी २० वर्षीय मतिमंद तरुणीवर वेळोवेळी अत्याचार केला. प्रत्येक वेळी समिनाबाई लुकमान तडवी ही महिला पहारा देण्याचे काम करीत होती, त्याशिवाय या लोकांशी शारीरीक संबंध ठेव, नाही तर तुला ते मारुन टाकतील असे सांगून धमकावत होती. या अत्याचारातून पीडितेने मुलीला जन्म दिला. या घटनेनंतर पीडिता घाबरुन नाशिक येथे गेली. या गोष्टीची वाच्यता झाल्यानंतर पीडितेने पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्यावरुन सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
घटना ऐकून न्यायालयही थक्क
अटकेतील चौघांना पोलीस उपअधीक्षक भारत काकडे व सहायक पोलीस निरीक्षक नीता कायटे यांनी शुक्रवारी न्या.डी.ए.देशपांडे यांच्या न्यायालयात हजर केले. सरकारी वकील भारती खडसे यांनी संपूर्ण घटनाक्रम कथन करुन महिलेकडूनच मुलीवर कसा अन्याय झाला, गुन्हा करण्यास कसे प्रोत्साहन दिले यासह गुन्हा दाखल होण्यासाठी पीडितेला करावा लागलेला संघर्ष याचे चित्र न्यायालयासमोर मांडले. ही घटना ऐकून खुद्द न्यायालयच थक्क झाले. सरकारी वकिलांच्या युक्तीवादानंतर चारही जणांना २ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, पीडितेची शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पीडितेला महिला सुधारगृहात दाखल करण्यात आले आहे. पीडितेने जन्म दिलेले बाळ नेमके कोणाचे याबाबतही वैद्यकिय तपासण्या केल्या जात आहे.