आई-वडील कारागृहात असताना पुत्रासही गांजासह पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 18:06 IST2018-06-13T18:06:35+5:302018-06-13T18:06:35+5:30
अमळनेर शहरातील घटना

आई-वडील कारागृहात असताना पुत्रासही गांजासह पकडले
अमळनेर : गांजा विक्रीप्रकरणी आई-वडील कारागृहात असतानाही पुन्हा गांजा व अवैध दारू बाळगणाऱ्या पुत्रास १३ रोजी पहाटे तीन वाजता छापा टाकून मुद्देमालासह अटक केली आहे
काही दिवसांपूर्वी डीवायएसपी रफिक शेख यांच्या पथकाने ताडेपुरा भागातील अशोक श्रावण कंजर याला व त्याच्या पत्नीला गांजा विक्री प्रकरणात अटक केली होती. त्याचा मुलगा अविनाश कंजर पुन्हा शहरात गांजा आणून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती पोलीस निरीक्षक अनिल बडगुजर यांना मिळाली. त्यांनी पोलीस नाईक प्रमोद बागडे, विजय साळुंखे , किशोर पाटील, योगेश महाजन, रवी पाटील, प्रदीप पवार, संतोष पाटील यांचे पथक तयार करून अचानक बुधवारी पहाटे तीन वाजून ५५ मिनिटांनी अविनाश अशोक कंजर याच्या घरी छापा टाकला. त्यात ४२ हजार ८६० रुपये किमतीचा चार किलो २८६ ग्राम गांजा व पाच हजार ८८ रुपयांची अवैध दारू आढळली.
अविनाश कंजरविरुद्ध अमली पदार्थ कायदा कलम २०, २२ आणि मुंबई पोलीस कायदा कलम ६५ इ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील रणजित नगराळे यांनी युक्तीवाद केला. न्यायाधील चौखंडे यांनी अविनाशला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.