दहावीच्या नऊ हजार विद्यार्थ्यांनी जायचे कुठे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:11 IST2021-07-23T04:11:37+5:302021-07-23T04:11:37+5:30
सागर दुबे लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अकरावीची प्रवेश क्षमता ४९ हजार ८० इतकी असून यंदा दहावीच्या ...

दहावीच्या नऊ हजार विद्यार्थ्यांनी जायचे कुठे?
सागर दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील अकरावीची प्रवेश क्षमता ४९ हजार ८० इतकी असून यंदा दहावीच्या परीक्षेत ५८ हजार २४९ हजार विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेता यंदा जवळपास ९ हजार १६९ विद्यार्थ्यांंच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. शासनाच्या धोरणानुसार अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावयाची आहे. परंतु, प्रवेशाचा पेच पाहता, या परीक्षेत सुध्दा रस्सीखेच पहायला मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यात जिल्ह्याचा निकाल ९९.९४ टक्के लागला लागला असून यंदा परीक्षेसाठी जिल्हाभरातून ५८ हजार २७९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यापैकी ५८ हजार २४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील अनुदानित, विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित अशा एकूण २१८ महाविद्यालयांमध्ये ४९ हजार ०८० अकरावीची प्रवेश क्षमता आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे आता विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाचा पेच निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, सीईटी परीक्षा उत्तीर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रमाने प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे यात सुध्दा अधिक गुण मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांची स्पर्धा दिसणार आहे.
सीईटीची वेबसाईट हँग
अकरावी प्रवेशासाठी २१ ऑगस्ट पासून सीईटी परीक्षा घेण्यात येणार होती. या परीक्षेसाठी आवेदन पत्र मागविण्यात येत आहेत. या प्रक्रियेला २० जुलैपासून सुरूवात झाली. हे मात्र, खरे असले तरी २१ जुलै रोजी सीईटीची वेबसाईट हँग झाली आणि ती तूर्त बंद करण्यात आली आहे. दरम्यान, वेबसाईट पूर्ववत झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कळविण्यात येणार असून पुरेसा कालावधी अर्ज करण्यासाठी देण्यात येणार आहे.
- दहावी उत्तीर्णांची संख्या : ५८,२४९
- अकरावी प्रवेक्ष क्षमता : ४९,०८०
- कला : २४,३२०
- विज्ञान : १७,२००
- वाणिज्य : ५,४२०
- संयुक्त : २,२००
कुठलाही ताण न घेता परीक्षा द्यावी....
सीईटी परीक्षा ही शंभर गुणांची असेल. त्यात गणित, विज्ञान, समाजशास्त्र, इंग्रजी या चार विषयांचे प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न विचारले जाणार आहे. या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना वेगळी तयारी करण्याची आवश्यकता नाही. केवळ दहावीत जो अभ्यास केला आहे, त्याची उजळणी विद्यार्थ्यांना करायची आहे. कुठलाही प्रकारचा मानसिक ताण न घेता परीक्षेला सामोरे जायचे आहे, अशी प्रतिक्रिया शिक्षण तज्ज्ञ राजेंद्र वाघुळदे यांनी दिली.
आयटीआय, पॉलिटेक्निकचा पर्याय
दहावीनंतर विद्यार्थ्यांना विविध व्याससायिक अभ्यासक्रमांना प्रवेशाची संधी असते. आयटीआय, पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांना दरवर्षी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेश घेतात. त्यामुळे उर्वरित विद्यार्थ्यांना आवडीच्या व्यवसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहे. तसेच आयटीआय व पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रिया प्रारंभ झाली आहे.