पाटी-पेन्सिल धरणारे हात भीक मागू लागतात तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:21 IST2021-09-07T04:21:27+5:302021-09-07T04:21:27+5:30
सुनील पाटील जळगाव : उद्याचे भविष्य ज्यांच्या हाती आहे, त्यांच्या हातात आज पाटी-पेन्सिल असावी त्या हातात भीक मागण्यासाठी कटोरा ...

पाटी-पेन्सिल धरणारे हात भीक मागू लागतात तेव्हा...
सुनील पाटील
जळगाव : उद्याचे भविष्य ज्यांच्या हाती आहे, त्यांच्या हातात आज पाटी-पेन्सिल असावी त्या हातात भीक मागण्यासाठी कटोरा आला. हे विदारक चित्र शहरातील मुख्य मार्ग व बाजारपेठांमध्ये दिसून येत आहे. खासकरून नवीन गोलाणी मार्केट परिसर, बसस्थानक, जिल्हा क्रीडा संकुल, रेल्वेस्थानक, बी.जे. मार्केटसह सिग्नलवर पाहावयास मिळत आहे. या निरागस बालकांना भीक मागण्यासाठी त्यांच्या आई-वडिलांकडूनही बळ मिळत असल्याचे वास्तव आहे.
भीक मागण्यासाठी लहान मुलांची खरेदी झाल्याचा प्रकार राज्यात औरंगाबादसह अनेक ठिकाणी उघडकीस आला. जळगावात लहान मुलांना त्यांच्या आई-वडिलांकडूनच भीक मागण्यासाठी वापरण्यात येत असल्याचे वास्तव आहे. हॉटेल, नास्त्याची गाडी तसेच गर्दीच्या ठिकाणी मुले भीक मागतात आणि आई-वडील पैसे गोळा करताना दिसतात. शासनाकडून विशिष्ट समुदायासाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्याचे नियोजन करण्यात आले असून, योजनादेखील आहेत. मात्र, निरक्षरता, अज्ञान, व्यसन, दारिद्र्य यामुळे विशिष्ट समुदायातील ही मुले भीक मागतात आणि भावी जीवनात ते वाममार्गाला लागत असल्याचे अनेक उदाहरण आहेत. जळगाव शहरात कमी वयातील मुले व्यसनेच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे.
मंदिराचे ओटे, तलाव परिसरात वास्तव्य
भीक मागणारे पालक व मुले हे सर्वाधिक मेहरुण तलाव परिसरात झोपड्यांमध्ये वास्तव्याला असल्याचे दिसून येतात. त्याशिवाय नवीन, जुने बसस्थानक, जिल्हा क्रीडा संकुल, सुभाष चौक, रेल्वेस्थानक, बी.जे. मार्केट भागात भीक मागणारी मुले रात्री त्याच भागात आई-वडिलांसह वास्तव्य करीत असल्याचे दिसून येतात. गायत्री मंदिराच्या ओट्यावरदेखील काही मुलांचे वास्तव्य दिसून आले. महामार्गदेखील भिक्षेकऱ्यांचे आश्रयस्थान झाले आहे. रात्रीला उघड्यावर विश्रांती आणि दिवसा भीक मागणे, हा त्यांचा शिरस्ता आहे.
बाहेर जिल्ह्यातील अनेक कुटुंब
जळगाव शहरात भीक मागणाऱ्या मुलांमध्ये अनेक जण बाहेर जिल्ह्यातील व आदिवासी भागातील असल्याचे दिसून आले. कोरोनाच्या काळातदेखील अनेक जणांनी जळगावात आश्रय घेतला. भीक मागून उपजीविका भागविणे ही नित्याचीच बाब झाली आहे. भीक मागणारे बालक जिल्ह्यातील विविध भागातील आहेत. मात्र, ना शिक्षण, ना सामाजिक भान, अशीच त्यांची स्थिती आहे.
बालहक्क कोण मिळवून देणार?
रेल्वे स्टेशन परिरसरात भीक मागणाऱ्या २०१९ मुलांना समतोल प्रकल्पाच्या माध्यमातून आतापर्यंत २५ राज्यात त्यांच्या पालकांच्या ताब्यात दिले आहे. भीक मागणारी काही मुले पोलीस सहकार्य व बाल कल्याण समितीच्या आदेशाने ताब्यात घेऊन बालगृहात ठेवण्यात आले होते. जळगाव व भुसावळात बालसंस्कार वर्ग सुरू करण्यात आले आहे.
-सपना श्रीवास्तव, समन्वयक, समतोल प्रकल्प