डेंग्यूची समस्या वाढत असताना केवळ कागदावर नाही तर रस्त्यावर फवारणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:17 IST2021-09-03T04:17:50+5:302021-09-03T04:17:50+5:30
भाजप पदाधिकाऱ्यांच्या आयुक्तांना सूचना : महापालिकेत आढावा बैठक लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, ...

डेंग्यूची समस्या वाढत असताना केवळ कागदावर नाही तर रस्त्यावर फवारणी करा
भाजप पदाधिकाऱ्यांच्या आयुक्तांना सूचना : महापालिकेत आढावा बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असून, मनपा प्रशासन मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. शहरात फवारणी नाही, अबेटींगचे काम देखील होताना दिसून येत नाही. त्यामुळे आता डेंग्यूची समस्या डोकेवर काढेल. त्या अगोदरच डेंग्यू आटोक्यात आणण्यासाठी केवळ कागदावर नाही तर रस्त्यावर फवारणीचे काम करा, अशा सूचना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत मनपा आयुक्तांना दिल्या आहेत.
गुरुवारी शहरातील विविध समस्यांबाबत आढावा घेण्यासाठी महापालिकेतील आयुक्तांच्या दालनात भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार सुरेश भोळे, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जिल्हा शहर सरचिटणीस डॉ. राधेश्याम चौधरी, गटनेते भगत बालाणी, कैलास सोनवणे, ॲड. शुचिता हाडा, डॉ. अश्विन सोनवणे, दीपमाला काळे, जितेंद्र मराठे, धीरज सोनवणे, विशाल त्रिपाठी व भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीत प्रशासनाकडून मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यासह सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. डेंग्यूच्या मुद्द्यावर प्रशासनाकडून होत असलेल्या हलगर्जीपणावरून भाजप नगरसेवकांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
लाट पसरल्यावर जाग येणार का ?
डेंग्यू, चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या शहरात वाढत जात आहे. मात्र, मनपाकडून होत असलेल्या उपाययोजना अतिशय संथगतीने होत आहेत. अशाप्रकारे काम होत राहिल्यास शहरात डेंग्यूचीही साथ पसरेल. त्यामुळे साथ येण्याची वाट न पाहता तत्काळ उपाययोजना करण्याचा सूचना आमदार सुरेश भोळे यांनी दिल्या आहेत.
१५ हजार एलईडी आहेत तरी कोठे ?
शहरात मनपाकडून साडेसात कोटी रुपयांचा ठेका देऊन १५ हजार एलईडी बसविण्याचा दावा केला जात आहे. मात्र, शहरातील अनेक भागात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी हे लाईट बसविल्यानंतर काही दिवसांतच खराब झाले आहेत. मात्र, मनपाकडून दुरुस्तीदेखील केली जात नाही. यावर तत्काळ दुरुस्ती करण्याचा सूचना नगरसेविका ॲड.शुचिता हाडा यांनी दिल्या. यासह गणेशोत्सव सुरू होणार असून, गणपती विसर्जन मार्गाची दुरुस्ती करण्याचाही सूचना आमदार सुरेश भोळे यांनी दिल्या आहेत.