किती हा गोंधळ...३० कि.मी.च्या अंतरासाठी आरसी बुकचा २८ दिवस प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:19 IST2021-09-22T04:19:54+5:302021-09-22T04:19:54+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : भारत व जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जायचे असेल तर त्यासाठी २५ दिवसांचा कालावधी लागत नाही, ...

What a mess ... 28 days journey of RC Book for a distance of 30 km | किती हा गोंधळ...३० कि.मी.च्या अंतरासाठी आरसी बुकचा २८ दिवस प्रवास

किती हा गोंधळ...३० कि.मी.च्या अंतरासाठी आरसी बुकचा २८ दिवस प्रवास

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : भारत व जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात जायचे असेल तर त्यासाठी २५ दिवसांचा कालावधी लागत नाही, मात्र आरटीओ कार्यालयातून निघालेल्या लायसन्स व वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र अर्थात आरसी बुकला जिल्ह्यातल्या जिल्ह्यात २८ ते ३४ दिवसांचा कालावधी लागत आहे. प्रगतीचे नगारे वाजविणाऱ्या पोस्ट व आरटीओ खात्याचा हा किती गलथान कारभार आहे, हे यावरुन सिध्द होत आहे. मुळात या दोन्ही वस्तू प्रिंट झाल्यानंतर ते मूळ मालकाला पाच दिवसाच्या आत मिळणे अपेक्षित आहे.

जळगाव आरटीओ कार्यालयातून दर महिन्याला ५ ते १० हजाराच्या संख्येने लायसन्स व आरसी बुक ग्राहकांना पाठविले जातात. जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात ४१ हजार १०९ लायसन्स तर ५२ हजार ११५ आरसी बुक आरटीओ कार्यालयातून प्रिंट होऊन रवाना झाली आहेत. या दोन्ही वस्तू ग्राहकाला लवकर मिळाव्यात यासाठी स्पीड पोस्टाच्या नावाने आरटीओ कार्यालयातच ५० रुपये जास्तीचे आकारले जातात. मात्र स्पीड पोस्ट ज्या गतीने धावायला पाहिजे त्या गतीने धावतच नाही. अगदी धीम्या पध्दतीने प्रवास सुरू आहे. जर याच पध्दतीने लायसन्स व आरसी बुक घरपोच मिळत असेल तर स्पीडच्या नावाने जास्तीचे शुल्क का आकारले जाते, असा सवालही ग्राहकांकडून विचारला जात आहे. दरम्यान, लायसन्स किंवा आरसी बुक नसल्यास वाहन तपासणीच्यावेळी पोलीस तसेच आरटीओकडून दंडात्मक कारवाई केली जाते, मग याला जबाबदार कोण? पोस्ट खात्याच्या या गलथान कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित मूळ मालक आरटीओ कार्यालयात सारखी विचारणा करीत आहेत.

हा घ्या पुरावा...

१) एरंडोल येथील जिजाबाई चौधरी यांच्या वाहनाचे आरसी बुक प्रिंट झाल्यानंतर आरटीओ कार्यालयातून २३ ऑगस्ट रोजी पोस्टात पाठविण्यात आले. त्यांना हे आरसी बुक २० सप्टेंबर रोजी मिळाले. जळगाव ते एरंडोल ३० किमीचे अंतर आहे, या अंतरात आरसी बुक पोहचायला २८ दिवस लागले. या कालावधीत चौधरी यांच्याकडून सातत्याने आरटीओ व पोस्टात विचारणा झाली.

२) रावेर तालुक्यातील आणखी एक उदाहरण असेच आहे. १७ ऑगस्ट रोजी चारचाकीचे आरसी बुक आरटीओ कार्यालयातून पोस्टात पाठविण्यात आले. त्यांना १७ सप्टेंबर रोजी ते मिळाले. रावेर ते जळगाव ४२ कि.मी.चे अंतर आहे. तब्बल ३० दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यावरच त्यांना हे बुक मिळाले. त्यांनीदेखील सातत्याने आरटीओ व पोस्टात विचारणा केली.

Web Title: What a mess ... 28 days journey of RC Book for a distance of 30 km

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.