बँकांमधील गर्दीचे करायचे काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:26 IST2021-05-05T04:26:00+5:302021-05-05T04:26:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करून विविध ठिकाणची गर्दी आटोक्यात आणण्याचे प्रयत्न ...

बँकांमधील गर्दीचे करायचे काय?
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करून विविध ठिकाणची गर्दी आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये अनेक ठिकाणची गर्दी कमी झाली आहे. मात्र, दुसरीकडे कोरोनाच्या वाढत्या संसर्गातही बँकांसमोरील गर्दी कायम आहे. बँकांतर्फे नागरिकांना ऑनलाइन व्यवहार करण्याचे आवाहन केले जात असतानाही बहुतांश खातेदार याकडे दुर्लक्ष करून थेट बँकेत येऊनचं आर्थिक व्यवहार करीत आहेत. कोरोनाच्या भयावह परिस्थितीतह बँकांसमोरील गर्दी कमी होत नसल्याने या गर्दीचे करायचे काय ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याची जास्त शक्यता असल्याने शासनातर्फे नेहमी गर्दीचे ठिकाणे असलेल्या धार्मिक स्थळे, शाळा-महाविद्यालय, उद्यान, चित्रपट गृहे, क्रीडांगण आदी सार्वजनिक ठिकाणे बंद ठेवली आहेत. तर दुसरीकडे गर्दीची शक्यता असलेल्या बँकिंग क्षेत्रातही नागरिकांना जास्तीत जास्त ऑनलाईन व्यवहार करण्याचे आवाहन केले आहे. विविध बँकांतर्फे धनादेश वटवणे व इतर अत्यावश्यक व्यवहार करण्याचेच सुचविले आहे. असे असताना बहुतांश खातेधारक बँकेत येऊनच प्रत्यक्ष व्यवहार करत आहेत. त्यामुळे बँकेतील गर्दी जैसे थे दिसून येत आहे. त्यात एप्रिल महिना संपल्यानंतर बहुतांश निवृत्ती वेतनधारकांचे वेतन बँकेत जमा झाले असून ते काढण्यासाठीही सोमवारी शहरातील स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, युनियन बँक, बडोदा बँक या बँकांमध्ये सकाळपासून गर्दी दिसून आली. या मध्ये अनेक नागरिकांकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुठलेही सोशल डिस्टसिंग पाळताना दिसून आले नाही. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग कमी न होता, वाढणार असल्याची स्थिती बँकांमधील गर्दीवरून अधिक बळावत आहे.
आवाहन करूनही नागरिक ऐकत नाही
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रत्येक बँकतर्फे ग्राहकांना ऑनलाईन व्यवहार करा, बँकांमध्ये गर्दी टाळा, सोशल डिस्टनिंगचे पालन करा, असे आवाहन करत आहे. मात्र, तरीदेखील नागरिक कुणाचेही न ऐकता सकाळपासूनच बँकांमध्ये गर्दी करीत असल्याचे बँकांच्यावतीने सांगण्यात आले.
लाखोंच्या घरात पैशांचे व्यवहार
सध्या बँकांमध्ये होणाऱ्या गर्दीत पैसे काढणाऱ्यांचीच संख्या जास्त असून कोरोनामुळे नागरिक रुग्णालयाचा वैद्यकीय खर्च भरण्यासाठीच लाखो रुपयांची रक्कम काढत आहेत. त्यामुळे सध्या धनादेश वटविण्याचे प्रमाण कमी असून पैसे काढणाऱ्यांचीच संख्या जास्त असल्याचे काही बँकांतर्फे सांगण्यात आले. नागरिकांच्या सोयीसाठी एटीएममध्ये पुरेसा पैसा असल्याचेही बँकांतर्फे सांगण्यात आले.
-----------------------------
दोन दिवस बँका बंद होत्या, त्यामुळे ही गर्दी वाढली आहे. तसेच आता पेन्शनर व इतर नोकरदार वर्गाचे पगार होत असल्याने त्यांचीही गर्दी वाढत आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँक प्रशासनातर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या असून ग्राहकांनाही सोशल डिस्टनिंग व मास्क वापराबाबत आवाहन करण्यात येत आहे.
- विवेक कात्यानी, व्यवस्थापक, बँक ऑफ बडोदा
शासनाच्या सूचनेनुसार आम्ही पैसे ठेवणे, काढणे, धनादेश वटवणे आदी महत्वाचे व्यवहार करत आहोत. खातेदारांची बँकेत गर्दी होऊ नये, यासाठी पाच-पाच लोकांचा गट करून आतमध्ये सोडत आहोत. तसेच नागरिकांना ऑनलाईन व्यवहार करण्याचे आवाहनही करीत आहोत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सर्व प्रकारची काळजी घेत आहोत.
- संजय गुप्ता, व्यवस्थापक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया
एटीएममधून साधारणतः तीस हजारापर्यंत पैसे काढता येतात. त्यापुढे काढता येत नाहीत. त्यामुळे बँकेत गर्दी असली तरी यावेच लागते. आता पेन्शनर नागरिकांची गर्दी असल्याने विलंब होत आहे. इतर वेळी मात्र तात्काळ नंबर लागतो.
- संदीप महाले, ग्राहक
माझी पेंशन काढण्यासाठी नातू बरोबर अर्धा तासापासून आली आहे. नंबर केव्हा लागेल, हे सांगता येत नाही. दरवेळेला अशीच गर्दी असते.
- लताबाई शिंदे
दर महिन्याला एक तारखेला पेंशन येते. त्यानंतर पैसे काढायला यावेच लागते. आता मी या ठिकाणी आलो आहे, केव्हा नंबर लागेल हे सांगता येत नाही.
- संतोष पाटील, ग्राहक