लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मराठा आरक्षणासंदर्भात सर्व अधिकार केंद्राने स्वत: कडे ठेवून राज्याचे अधिकार काढून घेतले होते, हे तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनाही माहित होते. मात्र, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षणासंदर्भात भाजपने त्यावेळी जे- जे काही केले तो एक राजकीय स्टंट होता, असा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी गुरूवारी केला. राष्ट्रवादीच्या वर्धापन दिन सोहळ्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मराठा आरक्षणासाठी आता सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन केंद्राकडे याबाबत पाठपुरावा करावा, देवेंद्र फडणवीस यांनीही हा आग्रह करावा, असेही खडसे यांनी म्हटले आहे. मराठा समाजाने मूक मोर्चे काढल्यानंतर संकट मोचकांना घेऊन भाजपने या समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप खडसे यांनी केला आहे. त्यावेळी नेमण्यात आलेल्या समित्या हा राजकीय स्टंट होता, असेही खडसे यांनी म्हटले आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न बसता स्वतंत्र आरक्षण मिळावे, याच मताचे हे सरकार असून यासाठी पक्षबाजुला ठेवून केंद्राकडे पाठपुरावा करावा, असे त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीचा वर्धापन दिन साजरा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २२ वा वर्धापनदिन राष्ट्रवादीच्या पक्ष कार्यालयात ध्वजारोहण व केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी माजी मंत्री एकनाथ खडसे, महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, समन्वयक विकास पवार, विलास पाटील, वाल्मिक पाटील, एजाज मलीक, वहाब मलिक, महिला जिल्हाध्यक्षा वंदना चौधरी, कल्पना पाटील, अश्विनी देशमुख, लता मोरे, शकीला तडवी, ममता तडवी, लता पाटील, उज्वला शिंदे, अर्चना कदम, वाय. एस. महाजन, राजेश पाटील, नामदेव चौधरी, अशोक लाडवंजारी, दिलीप माहेश्वरी, सुनिल माळी, राजेश गोयर, सलीम इनामदार, मझर पठाण, रिजवान खाटीक, कौसर काकर, नईम खाटीक, जुबेर खाटीक, संजय चौहान, पराग पाटील, उज्ज्वल पाटील, ॲड. कुणाल पवार, एस. एस. पाटील, स्वप्नील नेमाडे, अरविंद चितोडीया. जितेंद्र बागरे, अरविंद मानकरी, अब्बास खाटीक आदी उपस्थित होते.