रात्रीच्या संचारबंदीसह आठवडे बाजार पुन्हा बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:25 IST2021-02-23T04:25:09+5:302021-02-23T04:25:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता सोमवारी जिल्हा प्रशासनाने अनेक निर्बंध घालत ‘मिनी लॉकडाऊन’ ...

रात्रीच्या संचारबंदीसह आठवडे बाजार पुन्हा बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता सोमवारी जिल्हा प्रशासनाने अनेक निर्बंध घालत ‘मिनी लॉकडाऊन’ जाहीर केले आहे. यामध्ये शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश दिले असून या दरम्यान असणाऱ्या परीक्षा घेण्यास सूट दिली आहे. संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील आठवडे बाजार पुन्हा एकदा बंद राहणार असून रात्री दहा ते पहाटे पाचपर्यंत संचारबंदी राहील. खासगी शिकवणीसह धार्मिक, सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदीसह सिनेमागृह, जलतरण तलाव, व्यायामशाळा, बगीचे बंद राहणार आहेत. निदर्शने, मोर्चे यांच्यावरही बंधने घालण्यात आल्याचे आदेशही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यंत्रणांना दिले आहेत.
जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने जिल्हा प्रशासनाने उपाययोजनांना वेग देत कारवाईचे सत्र सुरू केले. यात गेल्या तीन दिवसांपासून तर कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेत मिनी लॉकडाऊनच जाहीर केले आहे.
रात्री फिरताना आढळल्यास कडक कारवाई
सोमवारी सकाळी पालकमंत्री गुलाबराव पाटील व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची चर्चा होऊन कडक कारवाईचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. यानंतर जिल्हाधिकारी राऊत यांनी जिल्ह्यात रात्री १० ते पहाटे पाच या वेळेत संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. अर्थात, या सात तासांमध्ये कुणीही रस्त्यावर फिरताना आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई होणार आहे.
शिक्षकांना उत्तरपत्रिका तपासता येणार
जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक व प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणी क्लासेस, सर्व प्रकारचे कोचिंग क्लासेस ६ मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. तथापि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपस्थितीस बंदी असली तरी संबंधित शैक्षणिक आस्थापनांना ऑनलाइन शिक्षणाची सुविधा देता येईल. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत ई-माहिती तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी करणे, निकाल घोषित करणे, ऑनलाइन शिक्षणाचे नियोजन व व्यवस्थापन करणे व तत्सम कामे करण्याकरिता संबंधित शाळा, महाविद्यालयात उपस्थित राहावे, असे आदेशात म्हटले आहे.
शाळा व महाविद्यालयात परीक्षा घेण्यास सूट
२२ फेब्रुवारी ते ६ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असले तरी या काळात परीक्षा घेता येणार असल्याचे आदेशही जिल्हाधिकारी राऊत यांनी काढले आहेत.
आठवडे बाजार पुन्हा बंद
आठवडे बाजारातही मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आठवडे बाजार बंद ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.
लग्न समारंभांविषयी पुन्हा एकदा कडक इशारा
लग्न समारंभ, कौटुंबिक कार्यक्रम यांचे आयोजन करताना या कार्यालयाकडून लागू करण्यात आलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहणार आहे. कोणत्याही परिस्थितीत ५० लोकांच्या उपस्थितीच्या मर्यादेचा भंग होणार नाही, याची संबंधितांनी गांभीर्याने दक्षता घ्यावी, असे स्पष्ट आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.
नाईट कर्फ्यू, कामगारांना ओळखपत्र आवश्यक
संपूर्ण जिल्ह्यात रात्री १० ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदी (कर्फ्यू) घोषित करण्यात आला आहे. या संचारबंदीदरम्यान आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित शासकीय आस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारे घटक, संचारबंदीच्या कालावधीत कंपनीत जाणारे व येणारे कामगार (संबंधित कामगारांना ओळखपत्रासोबत बाळगणे बंधनकारक राहील); बाहेरगावाहून येणाऱ्या प्रवाशांना सुविधा देण्यासाठी ऑटोरिक्षा यांना मुभा राहणार आहे. ऑटोरिक्षामधून चालक वगळता केवळ दोन व्यक्तींनाच प्रवास करता येणार आहे. तसेच आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक, पेट्रोल पंप, गॅरेजेस अशा आस्थापनांना सूट राहणार आहे.
निदर्शनांना बंदी
गर्दी जमवून करण्यात येणारी निदर्शने, मोर्चे, रॅली यांना बंदी घालण्यात आली आहे. यात केवळ ५ जणांच्या उपस्थितीत स्थानिक पोलीस विभागाची परवानगी घेऊन संबंधित शासकीय विभागास निवेदन देता येणार आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधित शिक्षेस पात्र राहतील, असे निर्देशही जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिले आहेत.