कृती समितीने उगारले आंदोलनाचे हत्यार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:18 IST2021-09-24T04:18:32+5:302021-09-24T04:18:32+5:30
जळगाव : डॉ. एस.आर. भादलीकर यांना प्रभारी कुलसचिवपदावरून हटवून सदर पदावर पात्र अर्हताधारक व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी ...

कृती समितीने उगारले आंदोलनाचे हत्यार
जळगाव : डॉ. एस.आर. भादलीकर यांना प्रभारी कुलसचिवपदावरून हटवून सदर पदावर पात्र अर्हताधारक व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी सोमवारपासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी व अधिकारी कृती समितीतर्फे आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. नुकतेच या संदर्भात प्रभारी कुलगुरू यांना निवेदन देण्यात आले आहे.
डॉ. एस.आर. भादलीकर यांनी कर्मचा-यांच्या सेवापुस्तिकांची गोपनीय माहिती मागणी केलेली नसताना शिक्षण संचालक पाठविल्याचा आरोप कृती समितीने केला होता. त्यानंतर भादलीकर यांच्याकडून प्रभारी कुलसचिवपदाचा पदभार काढण्यात यावा, यासाठी कृती समितीने प्रभारी कुलसचिवांच्या दालनासमोर दोन दिवस आंदोलन केले होते. त्यानंतर भादलीकर यांनी स्वत:हून प्रभारी कुलसचिवपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ए.बी. चौधरी यांच्याकडे तो पदभार सोपविण्यात आला. मात्र, चौधरी यांनी प्रभारी कुलसचिवपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुन्हा प्रभारी कुलगुरू यांनी डॉ. एस.आर. भादलीकर यांच्याकडे तो पदभार सोपविला आहे. त्यामुळे भादलीकर यांना त्या पदावरून हटवून नवीन व्यक्तीची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी कृती समितीकडून कुलगुरूंकडे करण्यात आली आहे. तसेच सोमवार, दि.२७ सप्टेंबरपासून आंदोलन करण्यात येणार असल्याचे समितीकडून निवेदनात म्हटले आहे.
असे आहे आंदोलनाचे स्वरूप
प्रभारी कुलगुरूंनी केलेल्या नियुक्तीच्या निषेधार्थ २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत कृती समितीकडून काळ्या फिती लावून कामकाज केले जाणार आहे. त्यानंतर ४ ते ९ ऑक्टोबर या कालावधीत लेखणीबंद आंदोलन तर ११ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत साखळी उपोषण केले जाणार आहे, असे निवेदनात म्हटले आहे.