...म्हणून 'ती' श्रीमंत महिला कपड्यात लपवायची किराणा वस्तू; चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 15:58 IST2021-02-27T04:22:33+5:302021-02-27T15:58:50+5:30

महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल; व्हिडीओ ठरतोय चर्चेचा विषय

Wealthy people in the house, however, came forward due to the viral video | ...म्हणून 'ती' श्रीमंत महिला कपड्यात लपवायची किराणा वस्तू; चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

...म्हणून 'ती' श्रीमंत महिला कपड्यात लपवायची किराणा वस्तू; चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

जळगाव : शासकीय सेवेतील उच्च पदावरून निवृत्त झालेले पती, एक मुलगा शासकीय सेवेत उच्चपदस्थ अधिकारी, मात्र अपघातात एका मुलाचा मृत्यू झाला आणि खचलेल्या महिलेला धक्का बसून तिची मानसिकता ढासळली. त्यातच तिच्याकडून चोरीसारखी घटना घडल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

शहरातील महाबळ परिसरातील नवजीवन सुपर शॉपीमध्ये एक महिला कपड्यांमध्ये विविध प्रकारचे किराणा साहित्य लपवून नेण्याचा प्रयत्न करीत असताना पकडली गेली व तिच्याकडील हे साहित्य काढून घेतले जात असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओविषयी लोकमतने अधिक माहिती जाणून घेतली असता ही महिला एका श्रीमंत घरातील असल्याची बाब समोर आली.

ग्राहकाने व्हिडिओ केला व्हायरल

महाबळ परिसरातील नवजीवन सुपर शॉपीमध्ये एक महिला वारंवार आपली साडी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करीत असल्याने यावरून शंका आली व त्यातच तिच्या कपड्यांमध्ये काही साहित्य लपविलेले असल्याचे लक्षात आले. त्यामुळे तिची तपासणी करण्यात आली असून त्यात शेंगदाणे, बदाम, तेल, बिस्कीट व इतर बरेच साहित्य आढळून आले. हे साहित्य महिलेला काढण्यास सांगितले त्याच वेळी एका ग्राहकाने याचे चित्रीकरण केले व तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. त्यामुळे हा चांगलाच चर्चेचा विषय ठरला.

मुलगा अपघातात गेला आणि खचलेल्या महिलेकडून घडला अनपेक्षित प्रकार

या महिलेचा पती शासकीय सेवेतील उच्च पदावरून निवृत्त झाले असून व एक मुलगा शासकीय सेवेत उच्चपदस्थ अधिकारी आहे. मात्र पाच वर्षांपूर्वी या महिलेच्या एका मुलाचा अपघातात मृत्यू झाला व तेव्हापासून या महिलेला मानसिक धक्का बसला. हळूहळू या महिलेची मानसिकता ढासळली व तिला मानसिक आजार जडला. या प्रकारातून तर सदर महिलेकडून थेट चोरीसारख्या घटनेचा प्रकार घडल्याचे समोर आहे. यात गुरुवारी ही महिला नवजीवन सुपर शॉपीमध्ये हाती पिशवी घेऊन गेली. तेथे खरेदीदरम्यान या महिलेने बरेच साहित्य लपवून नेण्याचा प्रयत्न केला व हा प्रकार उघडकीस आला.

सामाजिक बांधिलकी जपत कुटुंबीयांनाच दिला आधार

चोरीसारखा प्रकार घडल्यानंतरही संचालक अनिल कांकरिया यांनी या महिलेविरुद्ध कोणतीही तक्रार दिली नाही. उलट ही महिला कोणाची तरी आई, बहीण, पत्नी असेल या विचाराने तिला घरी जाऊ दिले. इतकेच नव्हे तिच्या घरी जाऊन कांकरिया यांनी कुुटुंबीयांची भेट घेतली व सर्व हकीकत जाणून घेतली. असे प्रकार टाळण्यासाठी सदर महिलेची आपण काळजी घ्या, असा सल्लाही त्यांनी दिला.

व्हिडिओ व्हायरल करू नका

हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याने हे प्रकार टाळावे, असे आवाहन अनिल कांकरिया यांनी केले आहे. यामध्ये ही महिला एका चांगल्या घरातील असून पती निवृत्त अभियंता, मुलगा उच्च शिक्षित आहे. ती मानसिक रुग्ण असल्याने त्यातून हा प्रकार घडला असून व्हिडिओ पुढे पाठवू नका, असे आवाहन त्यांनी केले.

Web Title: Wealthy people in the house, however, came forward due to the viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.