आम्हाला कोरोना होत नाही, आम्ही मास्क घालणार नाही म्हणत केली दगडफेक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:16 IST2021-04-07T04:16:35+5:302021-04-07T04:16:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपा उपायुक्त संतोष वाहुळे हे मंगळवारी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकासोबत जोशी पेठ भागातील बागवान ...

आम्हाला कोरोना होत नाही, आम्ही मास्क घालणार नाही म्हणत केली दगडफेक
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मनपा उपायुक्त संतोष वाहुळे हे मंगळवारी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकासोबत जोशी पेठ भागातील बागवान गल्लीत अनाधिकृत हॉकर्सवर कारवाई करण्यासाठी गेले असताना, या ठिकाणी जमलेल्या जमावाने मनपा उपायुक्तांच्या वाहनावर दगडफेक केली असून, या भागातून मनपाच्या पथकाला पळवून लावण्याचा प्रकार मंगळवारी दुपारी १२ वाजता सुमारास घडला. या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मंगळवारी महापालिकेचे उपायुक्त संतोष वाहुळे यांना अनेक फळ विक्रेत्यांचा तोंडावर मास्क न घालताच व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले. मनपाचे पथक जोशी पेठेतील बागवान गल्लीत आले असतानाच काही फळ विक्रेत्यांनी मनपा कर्मचार्यांची हुज्जत घालण्यास सुरुवात केली. उपायुक्तांनी फळ विक्रेत्यांना शिस्तीत व्यवसाय करण्याच्या सूचना दिल्या, मात्र तरीही काही विक्रेत्यांनी मनपा उपायुक्तांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करत व्यवसाय जसे आहेत तसेच सुरू राहतील अशी भूमिका घेतली.
मास्क लावण्याच्या सूचना दिल्यानंतर वादाला सुरुवात
मनपा उपायुक्त संतोष वाहुळे यांनी फळ विक्रेत्यांना नियमांचे पालन करून व्यवसाय सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या, मात्र व्यवसाय सुरू असताना मास्क घालावा अन्यथा माल जप्त करण्यात येईल असा इशारा उपायुक्तांनी दिला. मात्र फळ विक्रेत्यांनी उपायुक्तांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले. तसेच आम्हाला कोरोना होत नाही असे सांगत आम्ही मास्क घालणार नाही, अशी भूमिका फळ विक्रेत्यांनी घेतली. त्यावर उपायुक्तांनी महापालिकेच्या पथकातील कर्मचाऱ्यांना फळ विक्रेत्यांचा माल जप्त करण्याच्या सूचना दिल्या. त्यावर आक्रमक झालेल्या फळ विक्रेत्यांनी व इतर व्यवसायिकांनी देखील महापालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यातून हा वाद वाढतच गेला. जमाव वाढल्यामुळे महापालिकेच्या पथकाने माघार घेतली.
परत जाणाऱ्या पथकावर दगडफेक
मनपा उपायुक्तांनी महापालिकेच्या पथकाला कारवाईचे आदेश दिल्यानंतर या ठिकाणी जमाव वाढत गेला. काही फळ विक्रेत्यांनी मनपा कर्मचाऱ्यांचे हुज्जत घालत, कारवाईला विरोध केला. जमाव अधिक आक्रमक होत असल्याने उपायुक्तांनी शनिपेठ पोलिस स्टेशनला फोन लावला. मात्र या ठिकाणी कोणीही फोन न उचलल्याने व जमाव वाढत असल्याने मनपाचे पथक परत फिरण्याचा तयारीत होते. असे असताना देखील जमावातील काही विक्रेत्यांनी महापालिकेच्या पथकावर दगडफेक करण्यास सुरुवात केली. यामध्ये मनपा उपायुक्तांच्या वाहनाचा काचा देखील फोडण्यात आल्या आहेत. वेळीच उपायुक्तांचे पथक या ठिकाणाहून निघाल्यामुळे मोठा अनर्थ टळला असे मनपा कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
वर्षभरातील तिसरी घटना
महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून शहरातील अनाधिकृत हॉकर्सला शिस्त लावण्यासाठी वेळोवेळी कारवाई राबविण्यात येत आहे. मात्र यामध्ये आता हॉकर्स विरुद्ध मनपा कर्मचारी असा वाद सुरू झाला आहे. जोशी पेठ व बागवान गल्लीत वर्षभरात मनपा कर्मचाऱ्यांना वर दगडफेक करण्याची ही तिसरी घटना आहे. याआधीही जून महिन्यात मनपा कर्मचाऱ्यांवर दगडफेक करण्यात आली होती. तसेच उपायुक्तांना काही विक्रेत्यांनी घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाकडून सुभाष चौक, शिवाजी रोड, बळीराम पेठ, घाणेकर चौक या भागातील अनाधिकृत हॉकर्सवर जोरदार कारवाईची मोहीम सुरू केली होती. यामध्ये अनेक हॉकर्स चा माल देखील जप्त करण्यात आला आहे.