आम्ही रक्तदान करतोच.. तुम्हीही करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:22 IST2021-06-16T04:22:26+5:302021-06-16T04:22:26+5:30

चाळीसगाव : आपल्याकडील काहीतरी देण्याने कुणाचे तरी प्राण वाचत असतील तर ते दान सर्वोच्च ठरते. म्हणूनच रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान ...

We donate blood .. you do too! | आम्ही रक्तदान करतोच.. तुम्हीही करा !

आम्ही रक्तदान करतोच.. तुम्हीही करा !

चाळीसगाव : आपल्याकडील काहीतरी देण्याने कुणाचे तरी प्राण वाचत असतील तर ते दान सर्वोच्च ठरते. म्हणूनच रक्तदानाला सर्वश्रेष्ठ दान म्हटले आहे. आम्ही रक्तदान करतोच.. तुम्हीदेखील करा, असा संदेश नियमितपणे रक्तदान करणाऱ्या तरुण मित्रांनी सोमवारी रक्तदातादिनी रक्तदान करून दिलाय. चाळीसगाव परिसरात ‘ब्लडमॅन’ अशी ओळख अधोरेखित झालेले पंकज देसले हे येथील तरुणाईत रक्तदानाचे महत्त्व मोठ्या तळमळीने रुजवत आहेत. त्यांनी ‘लाइफ सेव्हर्स’ ग्रुपच्या माध्यमातून दोन हजारांहून अधिक रक्तदात्यांची साखळी जोडली आहे. कोरोनाकाळातही अनेक गरजू रुग्णांसाठी या रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे.

कोरोनाकाळात १५० रुग्णांना जीवनदान

सोशल माध्यमाव्दारे पंकज पाटील यांनी रक्तदात्यांची मोठी साखळी जोडली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कुठेही प्रसिद्धीसाठी चढाओढ न करता त्यांनी हे काम सुरू ठेवले आहे. विशेष म्हणजे कोरोनाच्या खडतर काळात त्यांनी १५० रुग्णांना रक्त उपलब्ध करून दिले. त्यांचे प्राण वाचविले आहे.

दीपक पाटील

हे कोदगाव येथील रहिवासी आहेत. आजवर त्यांनी २२ वेळा रक्तदान केले आहे. सोमवारीही त्यांनी रक्तदान करून रक्तदातादिन साजरा केला. ते सांगतात, ग्रामीण भागात रक्तदानाविषयी वेगवेगळे गैरसमज आहे. ज्याची प्रकृती चांगली आहे, असा कुणीही रक्तदान करू शकतो. रक्तदानाने माणुसकी धर्म जपला जातो. रुग्णांचे प्राण रक्तदानाने परत येतात. हे मोठे सामाजिक कामच आहे. सेवादेखील आहे.

......

राहुल वाकलकर

यांचा रक्तगट ‘ओ’ निगेटिव्ह आहे. हा रक्तगट दुर्मीळ असल्याने रात्री-अपरात्री राहुल वाकलकर अटीतटीच्या प्रसंगी रक्तदानास तयार असतात. दुर्मीळ रक्तगट असल्याने ते नियमितपणे रक्तदान करीत नाही. मात्र त्यांच्या रक्तगटाची आवश्यकता असल्यास ते तात्काळ रक्तदानासाठी स्वेच्छेने येतात. वाकलकर सांगतात, रक्तदानाने शरीर सुदृढ होते. तरुणांनी रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे.

.........

राकेश बोरसे

हे आश्रमशाळेत शिक्षक असून, सामाजिक उपक्रमांमध्ये नेहमी सहभागी होतात. दर तीन महिन्यांनी ते आवर्जून रक्तदान करतात. आतापर्यंत ३० ते ३५ वेळा रक्तदान केले आहे. रक्तदान शिबिरेही त्यांनी भरवली आहेत. ‘रक्तदान करताना आणि केल्यानंतरदेखील कोणताही त्रास होत नाही. न घाबरता प्रत्येकाने रक्तदान केले पाहिजे. नियमितपणे रक्तदान केल्यास शरीर सुदृढ बनते’, असे बोरसे सर्वांना सांगतात.

.....

उदय सोनार

यांचा रक्तगटही दुर्मीळ आहे. त्यामुळे अटीतटीच्या प्रसंगी ते सहज रक्तदानासाठी तयार असतात. त्यांचा रक्तगट ‘ए’ निगेटिव्ह आहे. ३०हून अधिकवेळा त्यांनी रक्तदान केले आहे. सोनार सांगतात, माझा रक्तगट दुर्मीळ आहे. त्यामुळे कठीणप्रसंगी कुणाचेही प्राण वाचवणे हे मी माझे कर्तव्य समजतो. त्यामुळे प्रत्येकाने दिलखुलासपणे रक्तदान करावे. यात घाबरण्यासारखे काहीही नाही.

.......

शांताराम पाटील

यांनी आजपर्यंत ४० वेळा रक्तदान केले आहे. तीन महिन्यांनी न चुकता रक्तदान करण्याचा संकल्पच त्यांनी केला आहे. रक्तदान शिबिरांमध्ये तरुणांना रक्तदानासाठी ते प्रोत्साहनही देतात. पाटील सांगतात, वृक्षांमुळे प्राणवायू मिळतो, तर रक्तदानाने कुणाचे तरी प्राण वाचतात. म्हणूनच वृक्ष लागवड व रक्तदान चळवळ आजच्या काळात गरजेच्या झाल्या आहेत. सोमवारी रक्तदातादिनी त्यांनी रक्तदान केले.

Web Title: We donate blood .. you do too!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.