जिथे गिरीश महाजन तिथे वॉटरग्रेस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:24 IST2020-12-05T04:24:46+5:302020-12-05T04:24:46+5:30

जळगाव : मनपातर्फे देण्यात येणारा साफसफाईचा ठेका भाजपची सत्ता आल्यानंतरच माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या निकटच्या लोकांची जवळीक असलेल्या ...

Watergress where Girish Mahajan is ... | जिथे गिरीश महाजन तिथे वॉटरग्रेस...

जिथे गिरीश महाजन तिथे वॉटरग्रेस...

जळगाव : मनपातर्फे देण्यात येणारा साफसफाईचा ठेका भाजपची सत्ता आल्यानंतरच माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या निकटच्या लोकांची जवळीक असलेल्या वॉटरग्रेसला देण्यात आला. जिथे जिथे भाजपची सत्ता आली व गिरीश महाजन यांचा संपर्क आला त्या नाशिक, जळगाव पाठोपाठ धुळ्यातही सफाईचा मक्ता वॉटरग्रेसलाच देण्यात आला. सत्तेच्या जोरावर अधिकाऱ्यांना हाताशी धरून चांगले काम न करताही भरमसाठ बिल काढून कमाई करण्यात येत असल्याचा आरोप या सर्वच ठिकाणी विरोधकांकडून होत आहे.

सत्ताधाऱ्यांना भागीदार करण्याची मोडस ऑपरेंडी

नाशिक येथील चेतन बोरा यांच्या वॉटरग्रेस कंपनीचे सफाईचा मक्ता घेणे व बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटची सेवा देण्याचे काम आहे. या कंपनीचे वैशिष्ट्य म्हणजे ज्या पालिका, महापालिकेत काम घ्यायचे, तेथील सत्ताधाऱ्यांना त्या कामाच्या मक्त्यात भागीदार करून घेतात. जेणेकरून कामात अडथळे येत नाहीत व बिलांनाही अडचण येत नाही. गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे सुनील झंवर यांच्या माध्यमातूनच नाशिक नंतर जळगावातही भाजपाची सत्ता येताच वॉटरग्रेसची एन्ट्री झाली.

त्रासामुळे काम बंद

जळगाव मनपाचा ठेका घेताना बोरा यांच्यासह जळगाव मनपातील सत्ताधारी गटातील चार नगरसेवक यात पार्टनर झाले. हे चारही नगरसेवक भाजपच्या मनपाअंतर्गत चार गटांचे होते. त्यामुळे मनपातील विरोधक व भाजपातीलच ईतर नगरसेवकांकडून विरोध, तक्रारी होत असल्याने व प्रशासनाकडून दंड आकारणी, अपेक्षित सुविधा न पुरविणे आदी कारवाई होत असल्याने मक्तेदाराने सेवा बंद करण्याचा ईशारा दिला. तर काम व्यवस्थित होत नसल्याचे सांगत मनपाने हे काम बंद केले.

सुनील झंवर झाले पार्टनर?

मात्र नंतर आयुक्त म्हणून सतीश कुलकर्णी आले. मक्तेदार वॉटरग्रेसने कोर्टात धाव घेतली. त्याचा धाक दाखवित प्रशासनाने पुन्हा वॉटरग्रेसचे काम सुरू करण्याचे संकेत दिले. यावेळी मक्तेदार वॉटरग्रेसने जर सर्व व्यवहार (?) चोख करूनही त्रास होत असेल तर काम कसे करायचे? असा सवाल केल्याने अखेर सुनील झंवर यांनी यात भागीदारी करून जळगावातील काम व नगरसेवकांनाही सांभाळावे, असे ठरले. त्यानुसार झंवर यांनी यात भागीदारी केल्याचा आरोप केला जात आहे. त्यानंतर तक्रारी करणाऱ्या नगरसेवकांना दरमहा १५ हजार रूपये हप्ताही सुरू करण्यात आल्याचा आरोप होत आहे.

अजित पवार यांच्याकडे तक्रार

राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार केली आहे. आता बीएचआर प्रकरणात झंवर यांच्या कार्यालयातून वॉटरग्रेसची कागदपत्रही जप्त केल्याचे उघड झाल्यानंतर अभिषेक पाटील यांनी शुक्रवार, ४ डिसेंबर रोजी पुन्हा उपमुख्यमंत्री पवार यांना पत्र पाठवून वॉटरग्रेसप्रकरणी खुली चौकशी (ओपन एन्क्वायरी) तातडीने करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Watergress where Girish Mahajan is ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.