धरणगावात भर पावसाळ्यातही उन्हाळ्यासारखी पाणीटंचाईची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:12 IST2021-07-15T04:12:41+5:302021-07-15T04:12:41+5:30

पाणीप्रश्नी शहरात हंडामोर्चा, पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यासारखी आंदोलने होऊनदेखील पालिका प्रशानासनाला कुठलाही फरक पडलेला दिसून येत नाही. शहरात ...

Water scarcity situation like summer even in heavy rains in Dharangaon | धरणगावात भर पावसाळ्यातही उन्हाळ्यासारखी पाणीटंचाईची स्थिती

धरणगावात भर पावसाळ्यातही उन्हाळ्यासारखी पाणीटंचाईची स्थिती

पाणीप्रश्नी शहरात हंडामोर्चा, पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यासारखी आंदोलने होऊनदेखील पालिका प्रशानासनाला कुठलाही फरक पडलेला दिसून येत नाही.

शहरात गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपासून पाण्यावरच राजकारण सुरू आहे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील हे याच मतदारसंघातून निवडून आले आहेत. तरीही पाण्याची अशी बिकट स्थिती शहरात आहे.

सणासुदीला अनेक लोक मूळ गावी म्हणजे धरणगावला येत असतात. त्यांनाही बाहेरून पाणी आणून तहान भागवावी लागत असते. विशेष म्हणजे या गंभीर विषयावर विरोधकदेखील मौन पाळून असल्याने सखेद आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

अनेक वेळा आंदोलने

शहरास सोळा ते सतरा दिवसाआड एकदा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांनी शिवसेनेची सत्ता असलेल्या धरणगाव नगरपालिकेवर डिसेंबर २०२० मध्ये देखील हंडा मोर्चा काढला होता. यासह अनेकवेळा आंदोलने झाली आहेत. मात्र, केवळ आश्वासन मिळत असते. तालुक्यात गेल्या दोन वर्षांपासून जळगाव जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडत आहे. असे असताना धरणगाव शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न निकाली निघालेला नाही. पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध असताना केवळ योग्य नियोजनाअभावी नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा होऊ शकत नाही. कृत्रिम पाणी टंचाईला धरणगावकर कंटाळले आहेत. मागे भाजपनेही याविरूद्ध आंदोलन केले होते. मात्र उपयोग झाला नाही.

----

पाण्यासाठी नगराध्यक्षांनी पाठपुरावा करून पाणीप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते. परंतु, पालिकेतील राजकारणी गटा-तटाच्या राजकारणात गुंतले आहेत. आम्ही आधीही आंदोलन केली आहेत आणि पाणी न मिळाल्यास आणखी तीव्र आंदोलन करू

-ॲड. संजय महाजन

----

धरणगावच्या नागरिकांची संयमाची परीक्षा न घेता नगरपालिका प्रशासन व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पाणी प्रश्न हा कायमस्वरूपी सोडविण्याच्या दृष्टीने त्वरित पाऊल उचलावे हीच अपेक्षा.

चंदन पाटील

तालुका उपाध्यक्ष काँग्रेस

----

कुंभारवाड्यात सोळा दिवसांनंतर पाणीपुरवठा होत आहे. नगरपालिका प्रशासनाने आम्हांला पाण्याच्या प्रश्नावर न्याय मिळवून द्यावा, हीच माफक अपेक्षा असून अगदी गढूळ असेल तरी चालेल. पण आम्हांला आठ दिवसांनंतर पाणीपुरवठा करावा.

- भगवान कुंभार

सामान्य नागरिक धरणगाव

----

धरणगाव शहरात पाणीपुरवठा सुरळीत झाला पाहिजे. गेल्या अनेक वर्षांपासून धरणगावचा पाणीप्रश्न सुटलेला नाही, तो लवकरात लवकर सुरळीत करावा, हीच प्रशासनाला विनंती आहे.

राहुल पवार, धरणगाव

Web Title: Water scarcity situation like summer even in heavy rains in Dharangaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.