कंडारी व साकेगावचा पाणीप्रश्न सुटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:12 IST2021-07-11T04:12:11+5:302021-07-11T04:12:11+5:30
भुसावळ : तालुक्यातील साकेगाव व कंडारी ग्रामपंचायतींची ‘जलजीवन मिशन’साठी निवड झाली असून कोट्यवधी रुपयांचा निधी गावातील पाणीपुरवठ्यासाठी मंजूर ...

कंडारी व साकेगावचा पाणीप्रश्न सुटणार
भुसावळ : तालुक्यातील साकेगाव व कंडारी ग्रामपंचायतींची ‘जलजीवन मिशन’साठी निवड झाली असून कोट्यवधी रुपयांचा निधी गावातील पाणीपुरवठ्यासाठी मंजूर झाला आहे. आमदार संजय सावकारे यांच्या प्रयत्नाने कामासाठी येत्या आठ दिवसांत सर्वेक्षणास सुरुवात होईल, असे एमजीपीचे अभियंता ए. जी. चव्हाण व नाशिक येथील कन्सल्टन्सी अधिकारी राजेंद्र सोनवणे यांनी प्रभारी सरपंच आनंद ठाकरे व ग्रामपंचायत प्रशासनास सांगितले.
साकेगाव येथील पाणी पुरवठ्याची पाईपलाईन व पाण्याची टाकी जवळपास ४० वर्षे जुनी असून आज रोजी पूर्णपणे जीर्ण अवस्थेत आहे. यासंदर्भात ग्रामपंचायत प्रशासनाने आमदार संजय सावकारे यांना वेळोवेळी निवेदन देऊन नवीन पाईपलाईन व पाण्याच्या टाकीची मागणी केलेली होती. यावर आमदार सावकारे यांनी केंद्र व राज्य शासनाकडे पाठपुरावा करीत, साकेगाव व कंडारी या गावांना नवीन पाईपलाईन व पाण्याची टाकी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले. यात जलजीवन मिशन अंतर्गत साकेगाव व कंडारी या दोन्ही गावांची निवड करण्यात आली आहे.
लगेचच होणार कामास सुरुवात
‘जलजीवन मिशन’चे विभाग प्रमुख ए. जी. चव्हाण व नाशिक येथील बीएलजी कन्स्ट्रक्शनचे विभागीय कन्सल्टंट राजेंद्र सोनवणे तसेच पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख लोखंडे आदींनी ग्रामपंचायत कार्यालयात भेट देऊन योजनेसंदर्भात माहिती दिली व गावातील संपूर्ण भौगोलिक परिस्थिती समजून घेतली. गावातील लोकसंख्येच्या प्रमाणात जलकुंभ उगमक्षमता त्याचबरोबर पाण्याचे स्त्रोत, त्यासाठी लागणारा विद्युतप्रवाह आदी या विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर अवघ्या आठ दिवसांत संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण करून तत्काळ योजनेला सुरुवात केली जाणार आहे.
यावेळी माजी सरपंच अनिल पाटील, माजी कृ.उ.बा.समिती सभापती संजय पाटील, प्रभारी सरपंच आनंद ठाकरे, सरपंच पती विष्णू सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल सपकाळे, पप्पू राजपूत, गजानन कोळी, कुंदन कोळी, गजानन पवार, सागर सोनवाल, सुभाष सोनवणे, धनराज भोई आदींची उपस्थिती होती.