नशिराबादला भर पावसाळ्यात सहाव्या दिवशी पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:19 IST2021-09-23T04:19:44+5:302021-09-23T04:19:44+5:30
नशिराबाद : येथील व परिसरातील धरणे, नाले तुडुंब भरून वाहत असले, तरी नशिराबादकरांना नियोजनाअभावी अजूनही सहाव्या, सातव्या दिवशी पाणीपुरवठा ...

नशिराबादला भर पावसाळ्यात सहाव्या दिवशी पाणी
नशिराबाद : येथील व परिसरातील धरणे, नाले तुडुंब भरून वाहत असले, तरी नशिराबादकरांना नियोजनाअभावी अजूनही सहाव्या, सातव्या दिवशी पाणीपुरवठा गावात होत आहे. त्यातच १६ कोटी रुपयांची जलशुद्धीकरण योजनाही शुद्ध पाणी देण्यात असमर्थ ठरली आहे. शुद्ध पाण्यासाठीची बोंबाबोंब कायम आहे. गावासाठी नवीन पाणीयोजना तयार करण्याच्या हालचाली गेल्या काही महिन्यांपूर्वी गतिमान झाल्या होत्या. मात्र, त्याचे काम थंडबस्त्यात आहे. धरणे उशाला असली तरी कोरड मात्र घशाला कायम आहे, असे म्हणण्याची वेळ ग्रामस्थांवर येऊन ठेपली आहे.
येथे पाणीटंचाईचा सामना नवीन नाही. दरवर्षी येथे पाणीसमस्या कायम आहे. कधी जलवाहिनी फुटते, वीजपंप नादुरुस्त, विहिरींची भूजल पातळी खालावणे, विजेचा लपंडाव वीजपुरवठा खंडित आदी कारणांमुळे पाणीपुरवठा विस्कळीत होऊन टंचाईचा सामना ग्रामस्थांना करावा लागतो. वाघुर, मुर्दापूर धरण व स्थानिक जलस्रोतांवर गावाचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. पाणीसमस्या नशिराबादकरांच्या नशिबी कायमच आहे. पाणीसमस्येवर मात करण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. त्यात कायमस्वरूपी पाणीयोजनेवर मात करण्यासाठी सोळा कोटी रुपयांची जलशुद्धीकरण योजनाही कार्यान्वित करण्यात आली, मात्र ती शुद्ध पाणीपुरवठा करण्यात असमर्थ ठरल्याने सर्वत्र फज्जा उडाला आहे. सध्या परिसरात धरणे, नाले, नदी तुडुंब भरून वाहत असले, तरी नशिराबादकरांना सहाव्या ते सातव्या दिवशी पाणीपुरवठा गावात होत आहे. गावात पाणीपुरवठ्याचे टप्पे मोठ्या प्रमाणावर असल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते. मध्यंतरी, विजेचा लपंडाव वाढल्यामुळे जलकुंभ भरण्यास उशीर होत असल्यामुळे काही भागात सातव्या दिवशी पाणीपुरवठा झाला, असे सांगितले जात आहे.
इन्फो
योजनेच्या व्हायरसवर चर्चेला उधाण
नशिराबादच्या पाणीयोजनेबाबत एका ग्रुपवर चांगलाच ऊहापोह झाला. स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत आपापली मते प्रदर्शित करून योजनेचे महत्त्व पटवून दिले. मात्र, ही योजना शेळगावऐवजी वाघुर येथून घेतली असती, तर यशस्वी ठरली असती, अशा या बाबतीत चर्चा रंगल्या. या सर्व चर्चांमुळे नशिराबादच्या पाण्याला राजकीय बुडबुडे आले आहे, हे मात्र तितकेच खरे... गावाच्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित यावे व पुन्हा ग्रामविकासासाठी निर्णय घ्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.