शहरावरील पाणी कपातीचे संकट काहीअंशी टळले आहे.
By Admin | Updated: September 21, 2015 00:23 IST2015-09-21T00:23:52+5:302015-09-21T00:23:52+5:30
खोलघर व आंबेबारा भरले : वीरचक प्रकल्पातही वाढतेय पाणीपातळी खोलघर व आंबेबारा भरले : वीरचक प्रकल्पातही वाढतेय पाणीपातळी

शहरावरील पाणी कपातीचे संकट काहीअंशी टळले आहे.
नंदुरबार : शहराला पाणीपुरवठा करणारे आंबेबारा धरण 90 टक्केपेक्षा अधिक भरले आहे. तर वीरचक प्रकल्पातील पाणीसाठय़ात दोन मीटरने वाढ झाली आहे. त्यामुळे ऑक्टोबरपासून दोन दिवसाआड पाणीपुरवठय़ाचा निर्णय तुर्तास पुढे ढकलण्यात आला असून सध्या ज्या पद्धतीने पाणीपुरवठा सुरू आहे त्याच पद्धतीने सुरू ठेवण्यात येणार आहे. पावसाळ्याच्या शेवटी का न होवो वरुणराजाने कृपा केली आहे. गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निम्मे प्रकल्प 50 टक्केपेक्षा अधिक भरले आहेत. तळोदा तालुक्यातील चार, शहादा तालुक्यातील दोन आणि नंदुरबार तालुक्यातील दोन असे आठ प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या मुख्यालयाचे ठिकाण असलेल्या नंदुरबार शहराच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न काहीअंशी सुटण्यास मदत झाली आहे. त्यामुळे शहरवासीयांच्या जिवातजीव आला आहे. परिणामी येते काही महिने तरी आणखी पाणी कपात होणार नाही, हे स्पष्ट आहे. दोन धरणे भरली शिवण नदीत ज्या धरणातून पाणी येते ते खोलघर आणि आंबेबारा धरण भरले आहे. खोलघर ओसंडून वाहत आहे तर आंबेबारा 90 टक्केपेक्षा अधिक भरले आहे. पावसाचा जोर ब:यापैकी राहिला, तर आंबेबारा देखील येत्या काही दिवसात ओसंडून वाहणार आहे. याशिवाय धनीबारा प्रकल्पाचा पाणीसाठादेखील समाधानकारक झाला आहे. हे तिन्ही प्रकल्प पूर्ण भरल्यावर त्यातून वाहणारे पाणी हे शिवण नदीद्वारे थेट वीरचक प्रकल्पात येते. खोलघर धरण भरल्यानंतर ते पाणी शिवण नदीद्वारे वीरचक प्रकल्पात येत आहे. तर खोलघर धरण ते वीरचक प्रकल्प यादरम्यान शिवण नदीला येऊन मिळणा:या नाल्यांना पाणी आल्याने शिवण सध्या दुथडी भरून वाहत आहे. परिणामी वीरचकचा पाणीसाठा वाढू लागला आहे. दीड ते दोन मीटरने वाढ वीरचक प्रकल्पातील पाणी पातळी गेल्या चार दिवसात दीड ते दोन मीटरने वाढल्याचे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले. सध्या वीरचक प्रकल्पात 6.300 दशलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. आंबेबारा आणि धनीबारा प्रकल्प भरण्याच्या मार्गावर आहेत. हे दोन्ही प्रकल्प भरल्यावर त्यातील पाणीदेखील वीरचक प्रकल्पात येणार आहे. वीरचकच्या अलीकडील हे तिन्ही प्रकल्प भरले, तर किमान डिसेंबर्पयत शिवण नदी प्रवाही असते. त्यामुळे वीरचकमधील पाणीसाठा वाढण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पावसाचा जोर आणखी कायम राहिल्यास वीरचकची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. सध्या कपात नाही नंदुरबार शहरात सध्या एक दिवसाआड अर्धा तास पाणीपुरवठा केला जात आहे. पूर्वी मुबलक पाणी होते, त्या वेळी एक दिवसाआड एक तास पाणीपुरवठा केला जात होता. एप्रिल महिन्यात पाणीटंचाई लक्षात घेता 15 मिनिटांची कपात करून एक दिवसाआड 45 मिनिटे पाणीपुरवठा करण्यात आला. त्यानंतर गेल्या महिन्यातील पाणीसाठा लक्षात घेऊन पालिकेने पुन्हा 15 मिनिटांची पाणी कपात करून एक दिवसाआड केवळ अर्धा तास पुरवठा करण्याचा निर्णय घेतला. सध्या केवळ अर्धा तास पाणीपुरवठा केला जात आहे. पाणीसाठय़ाची स्थिती गेल्या महिन्याप्रमाणेच राहिली असती तर 1 ऑक्टोबरपासून दोन दिवसाआड केवळ अर्धा तास पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेण्यात येणार होता. त्या वेळी ज्या भागात पाणीपुरवठा केला जाणार आहे, त्या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात येणार होता. जेणेकरून नागरिकांनी विद्युत मोटारी लावू नये हा त्यामागचा उद्देश होता. दोन दिवसाआड आणि तीही केवळ अर्धा तास पाणीपुरवठय़ाची वेळ आली असती तर शहरावर पाणीटंचाईचे मोठे संकट ओढवले असते. सुदैवाने निसर्गाने तशी वेळ सध्यातरी येऊ दिली नाही. त्यामुळे सध्या ज्या पद्धतीने अर्थात एक दिवसाआड अर्धा तास पाणीपुरवठय़ाचा निर्णय कायम राहणार आहे. जर पावसाने आणखी कृपा केली आणि वीरचक प्रकल्पात 50 टक्केपेक्षा अधिक पाणीसाठा झाला, तर पूर्वीप्रमाणेच एक दिवसाआड एक तास पाणीपुरवठा करण्याचा निर्णय होणार आहे. अर्थात सर्वकाही पावसावर अवलंबून राहणार आहे.