तारादूत प्रकल्पावरील स्थगिती न उठवल्यामुळे उपोषणाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:13 IST2021-05-31T04:13:14+5:302021-05-31T04:13:14+5:30
मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी असलेली छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था, सारथी कुणबी, मराठा ...

तारादूत प्रकल्पावरील स्थगिती न उठवल्यामुळे उपोषणाचा इशारा
मराठा समाजाच्या सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी असलेली छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था, सारथी कुणबी, मराठा या गटाच्या सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी स्थापन करण्यात आली. मात्र आज सारथी संस्था कोणत्या ना कोणत्या कारणावरून वादात असते. सारथीने सुरू केलेला तारादूत प्रकल्प सरकारी अधिकारी आणि सरकारच्या उदासीनतेमुळे बंद केला आहे. तो प्रकल्प चालू व्हावा म्हणून अनेक वेळा आंदोलने केली गेली. आता मराठा आरक्षण कोर्टाने नाकारले, त्यामुळे सारथी तर सरकारच्या हातात आहे. निदान तारादूत प्रकल्प तरी सुरू करण्यात यावा, यासाठी सर्व स्तरांतून मागणी होत आहे.
एकीकडे सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केले आणि दुसरीकडे शासन आणि अधिकारी यांच्या केवळ वेळकाढूपणामुळे तारादूतसारखे महत्त्वपूर्ण प्रकल्प आज रखडलेले आहेत. म्हणून महराष्ट्रातील तारादूतांनी आतापर्यंत तीन वेळेस आंदोलन केले. सारथी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आणि महाविकास आघाडी सरकारच्या उदासीनतेमुळे तारादूत पुन्हा आक्रमक होताना दिसत आहे. कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे शेतात किंवा घरी बसून उपोषण करण्याचा निर्णय तारादूतांनी घेतला आहे. त्यामुळे महराष्ट्रातील तारादूत घरी बसून एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करत आहेत.
याबाबत सारथी संस्थेला दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, संचालक मंडळाच्या २ मार्च २०१९च्या बैठकीनुसार तारादूत प्रकल्प सुरू करण्यात आला; परंतु या प्रकल्पाला महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर स्थगिती देण्यात आली. त्यामुळे तारादूतांनी वेळोवेळी विचारणा केली असता चौकशीचा मुद्दा समोर केला जातो. पंधरा महिन्यापासून सारथी संस्थेच्या चौकशीमुळे सर्वच प्रकल्प बंद केले आहेत. त्यामुळे तारादूत यांना अकरा महिन्यांच्या नियुक्त्या द्याव्यात अन्यथा कोविड संपल्यानंतर तारादूत आणि मराठा संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचे उपोषणकर्ते तारादूत सुनील देवरे यांनी सांगितले आहे.