सायगाव येथे घराची भिंत कोसळली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:20 IST2021-09-07T04:20:24+5:302021-09-07T04:20:24+5:30
सायगाव येथील नव्या गावात नांदगाव रोडलगत राजू मन्सुरी आणि त्यांचे कुटुंब एका छोट्याशा मातीच्या घरात राहत आहे. रात्री सर्व ...

सायगाव येथे घराची भिंत कोसळली
सायगाव येथील नव्या गावात नांदगाव रोडलगत राजू मन्सुरी आणि त्यांचे कुटुंब एका छोट्याशा मातीच्या घरात राहत आहे. रात्री सर्व कुटुंब झोपले होते. सकाळी राजू मन्सुरी हे चहा पिण्यासाठी हॉटेलवर गेले होते व सुरय्या मन्सुरी, शोएब मन्सुरी, नसरीन मन्सुरी गाढ झोपेत होते. सकाळी ४ ते ५ वाजेदरम्यान अचानक भिंत कोसळून सुरय्या मन्सुरी यांच्या कंबरेपासून खाली मातीच्या ढिगाऱ्यात दाबली गेल्याने गंभीर जखमी झाली व शोएब मन्सुरीच्या उजव्या पायाला मार लागला असून दोघांना मालेगाव येथे नेण्यात आले आहे.
पडलेल्या भिंतीचा पंचनामा तलाठी गणेश गढरी, सागर पाटील यांनी केला. सोबत सामाजिक कार्यकर्ते दिनेश महाजन उपस्थित होते.
गरिबांना घरकुल गरजेचे
सायगाव येथील नवेगावात हातावर मोलमजुरी करणारा मोठा वर्ग आहे. आज बराच गरीबवर्ग मातीच्या घरात राहतो. कोणी आजूबाजूला पत्तरे आडे लावून राहतो. कोणी वरची पानड टाकून झापमध्ये राहतात. त्यांना घरकुल कधी मिळणार का? त्यांची पूर्ण गरिबी मातीच्या घरात जाणार. आजपर्यंत घरकुल फक्त गुणांवर चालू आहे. मग या गरिबांचे गुण केव्हा येणार? आता तरी गुणांचा विचार न करता मातीचे घर त्याला घरकुल देण्यात यावे. कारण पावसाळा लागला की, या गरिबांना चार महिने कसे जातील? याची चिंता भेडसावते आणि प्रशासन फक्त गुणावरच चालते.
आज सायगाव येथील नव्या गावात बरेच गरीब कुटुंब राहतात आणि त्यांना घरकुलाची अत्यंत गरज आहे. तरी शासनाने यांची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. आज गरिबीत जीवन जगणाऱ्या राजू मन्सुरी आणि सुरय्या मन्सुरी कुटुंबासहित राहतात आणि आज त्यांच्यावर भिंत कोसळून हे संकट ओढवले. पण नशीब बलवत्तर म्हणून सुरय्या वाचली. पण अजून जर गरिबांना चांगले घरकुल मिळाले नाही तर अजून किती सुरय्या जखमी होतील, सांगता येत नाही आणि ग्रामपंचायतीनेदेखील यांची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.