व्हायरल सर्दी, तापाचे संकट : रुग्णालयांमध्ये वाढली लहान मुलांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:22 IST2021-09-08T04:22:17+5:302021-09-08T04:22:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून व्हायरल सर्दी व तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, यात लहान मुलांचे ...

व्हायरल सर्दी, तापाचे संकट : रुग्णालयांमध्ये वाढली लहान मुलांची गर्दी
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून व्हायरल सर्दी व तापाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून, यात लहान मुलांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील ओपीडीतही लहान मुलांची गर्दी वाढली आहे. यात न्यूमोनियाचे रुग्णही आढळून येत आहेत. शिवाय डेंग्यूसदृश्य रुग्णांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे अशा वातावरणात बालकांची काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.
खासगीत दिवसाला ५० रुग्ण
गेल्या काही दिवसांपासून खासगी रुग्णालयांतही लहान मुलांची गर्दी वाढली आहे. यात दिवसाला ५० मुले तपासणीला येत असून, आमच्याकडे २० ते २५ मुले दाखल असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. गौरव महाजन यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दिवसाला ५५ ते ६० मुले तपासणीला येत आहेत. तर ४० लहान मुले दाखल आहेत.
डेंग्यूचे संकट वाढले
जिल्हाभरात डेंग्यूबाधित तसेच संशयित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या ७ महिन्यांच्या तुलनेत जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात सर्वाधिक डेंग्यू रुग्ण आढळून आले आहेत. यात अनेक लहान बालकांचाही समावेश आहे. व्हायरल इन्फेक्शन हे आठवडाभर असते, पण त्यापेक्षा अधिक काळ ताप राहिल्यास बालकांची न्यूमोनिया तसेच डेंग्यूची तपासणी केली जात असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ही काळजी घ्या
पाणी उकळूनच प्यावे. पावसात, थंड पाण्यात भिजू नये. आहार पौष्टिक असावा. तेलकट, तूपकट तसेच अधिक गोड खाणे टाळावे. बालकांचे मच्छरपासून संरक्षण होईल याची काळजी घ्यावी. लक्षणे जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.