अमळनेरमध्ये विनोदी संदेशातून शिक्षकांची व्यथा व्हायरल
By Admin | Updated: May 4, 2017 12:56 IST2017-05-04T12:56:16+5:302017-05-04T12:56:16+5:30
शासन बाहुबली तर पीडित शिक्षकांना दिली बाहुबलीची उपमा

अमळनेरमध्ये विनोदी संदेशातून शिक्षकांची व्यथा व्हायरल
अमळनेर, दि.4 - स्टाफ पोर्टलची माहिती शासनाने शिक्षकांना दिलेल्या मुदतीत तातडीने भरायला लावली आहे. त्यामुळे एकाचवेळी अनेक पातळ्यांवर शिक्षकांना काम करावे लागत असल्याने, शिक्षकवर्गही त्रस्त झालेला आहे. त्यामुळेच वैतागलेल्या कटप्पाने बाहुबलीला मारले असा विनोदी संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामागे शासनाच्या धोरणामुळे शिक्षकांचे काय हाल होत आहेत हे व्यक्त करण्याचा प्रय} केला आहे. यात कटप्पा म्हणून शिक्षक तर बाहुबली म्हणून शासनाला संबोधले आहे.
शासनाने स्टाफ पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकांची संपूर्ण माहिती मागितली आहे. शासनाकडून कुठलीही माहिती अल्पमुदतीत ऑनलाईन मागितली जाते. त्यात अनेक अडचणी येतात. इंटरनेट सुरू न होणे, तांत्रिक अडचणी येणे यासारख्या अनेक समस्या असतात. त्याचा विचार न करता सरळ जबाबदारी शिक्षकांवर ढकलली जाते. त्यांना कारवाईची धमकी दिली जाते. त्यात त्यांची अडचण कशी होते याच संतप्त भावनेतून शिक्षकांनी कटप्पाचे संदेश व्हायरल केले आहेत. तो संदेश असा आहे
‘कट्टपाने बाहुबलीला का मारल’ याचे उत्तर सापडले.
बाहुबलीने (शासनाने) कट्टपाला (शिक्षकाला) पोर्टल वर माहिती भरायला व्हाटस् अपवर सांगितले. कट्टपाला वाटले तितकी सोपी प्रक्रिया नव्हती. परत बाहुबलीचा व्हाटसअपवर मेसेज आला की चार दिवसातच माहिती भरली पाहिजे. मग काय कट्टपा लॅपटॉप घेऊन बसला की माहिती भरायला. दिवसा साईट बंद. रात्री स्लो. बिचारा वैतागून गेला. परत बाहुबलीचा मेसेज आला की जर माहिती भरली नाही तर सर्वस्वी जबाबदारी तुमची राहील. पुढील कार्यवाही केली जाईल. मग काय कट्टपा ना जेवायचा, ना झोपायचा, त्याने तर आंघोळ करायच बंद केल. पण साईट स्लो, कधी बंद बिचारा वैतागून गेला. मग काय घेतली तलवार आणि केल की बाहुबलीच काम... संदेश विनोदी असला तरी गंभीर विचार करायला लावणारा आहे मनस्थिती बिघडल्यास शिक्षक कोणत्या स्तरावर जाऊ शकतो हेच या संदेशात सुचवण्यात आले आहे.