बेवारस बॅगमध्ये आढळली गावठी दारू
By Admin | Updated: March 3, 2017 00:10 IST2017-03-03T00:10:04+5:302017-03-03T00:10:04+5:30
इंद्रप्रस्थ नगरात सुरक्षा यंत्रणेची धावपळ : बॉम्बशोधक पथकाकडून पाहणी

बेवारस बॅगमध्ये आढळली गावठी दारू
जळगाव : इंद्रप्रस्थ नगरात गुरुवारी संशयास्पद बॅग आढळून आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते, त्याचप्रमाणे बॅगेत काय आहे याबाबत उत्सुकताही ताणून धरलेली होती. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने घटनास्थळी धाव घेऊन यंत्राद्वारे तपासणी केली. घातक द्रव्य अथवा धोकेदायक काहीच नसल्याचे सिग्नल मिळाल्यानंतर कर्मचाºयांनी बॅग उघडली, मात्र त्यात चक्क रबरी ट्युब होता व त्यात गावठी दारू आढळून आली.
या घटनेमुळे सुरक्षा यंत्रणेची धावपळ झाली तर नागरिकांच्या भीतीचे रुपांतर मनोरंजनात झाले.
इंद्रप्रस्थ नगरतील रहिवासी राम जडेजा यांच्या कुटुंबातील महिला सदस्य सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास अंगणाची सफाई करण्यासाठी घराबाहेर पडल्या. त्यावेळी त्यांना अंगणात बेवारस व वजनदार संशयास्पद बॅग दिसली. जडेजा कुटुंबीयांनी हा प्रकार लगेच आजुबाजूच्या नागरिकांच्या लक्षात आणून दिला.
येथील रहिवासी अॅड.दिलीप पोकळे यांनी या बेवारस बॅगेची माहिती शहर पोलीस ठाण्यात कळविली.
माहिती मिळताच दुष्यंत खैरनार, संजय भालेराव, प्रीतम पाटील यांना घटनास्थळी रवाना करण्यात आले तर बॉम्बशोधक पथकालादेखील पाचारण करण्यात आले.
बॅगेत धोकेदायक काहीच नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर रहिवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला.
नंतर ही बॅग शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली.
रबरी ट्युबमध्ये आढळली गावठी दारू...
पथकातील अरुण पाटील,नंदलाल चौधरी, देवानंद साळुंखे, विनोद सूर्यवंशी, अतुल चौधरी, राजेंद्र पाटील, राजेंद्र जंगले यांनी बॅगेची तपासणी केली असता त्यात रबरी ट्युबमध्ये गावठी दारू भरल्याचे आढळून आले.