सुंदर फुललेल्या निसर्गाचे गंध घेऊन गावे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 03:06 PM2019-08-03T15:06:07+5:302019-08-03T15:08:27+5:30

आयुष्यातील छोट्या-छोट्या घटनांमधून आणि कृतीमधून निसर्गाचे संवर्धन करणाऱ्या अनेक समर्पित व्यक्तींपैकी एक म्हणजे पाचोरा येथील जि.प. कन्याशाळा क्रमांक एकमधील शिक्षिका असलेल्या आशा विलास राजपूत या होत. गाजावाजा न करता किंवा आपण केलेल्या कार्याचे कोणतेच प्रदर्शन न मांडता आपल्या पुरतेच मर्यादित राहून निसर्गाच्या संवर्धनात आणि मानव कल्याणात आपला खारीचा वाटा उचलणाºया अनेकांमधील त्या एक आहेत.

Villages with the smell of beautiful flowers! | सुंदर फुललेल्या निसर्गाचे गंध घेऊन गावे!

सुंदर फुललेल्या निसर्गाचे गंध घेऊन गावे!

Next
ठळक मुद्देसंडे हटके बातमीनिसर्गमित्र पुरस्काराच्या मानकरी आशा राजपूत ठरताहेत निसर्ग आणि मानवतेचा दुवा!

महेश कौंडिण्य
पाचोरा, जि.जळगाव : निर्मात्याच्या आविष्काराने
धुंद होऊन जावे,
सुंदर फुललेल्या निसर्गाचे
गंध घेऊन गावे!
या काव्यपंक्ती शाश्वत आणि वास्तव ठरवत आयुष्याच्या वाटेवर केवळ वृक्षच नव्हे तर प्राणी, पशु-पक्षी यांनासुद्धा पर्यावरणातील तितकाच महत्त्वाचा घटक मानत त्यांच्यासाठी आयुष्यातील छोट्या-छोट्या घटनांमधून आणि कृतीमधून निसर्गाचे संवर्धन करणाऱ्या अनेक समर्पित व्यक्तींपैकी एक म्हणजे पाचोरा येथील जि.प. कन्याशाळा क्रमांक एकमधील शिक्षिका असलेल्या आशा विलास राजपूत या होत. गाजावाजा न करता किंवा आपण केलेल्या कार्याचे कोणतेच प्रदर्शन न मांडता आपल्या पुरतेच मर्यादित राहून निसर्गाच्या संवर्धनात आणि मानव कल्याणात आपला खारीचा वाटा उचलणाºया अनेकांमधील त्या एक आहेत. म्हणूनच निसर्ग मित्र समिती, धुळे आणि नंदुरबार येथील नंदुरबार तालुका विधायक समितीद्वारे त्यांना नुकताच राज्यस्तरीय निसर्गमित्र पुरस्कार प्राप्त झाला.
'असे जोडले निसर्गाशी नाते वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे'
या तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे आशा राजपूत यांनी सुरुवातीस घरात वड-पिंपळ यासारखे मोठे वाढणारे वृक्ष कुंडीत लावले आणि ते वृक्ष थोडेसे मोठे झाल्यानंतर त्यांनी अनेक गरीब व्यक्तींना भेट म्हणून दिले आणि जर त्यांनी ते वृक्ष जगवले तर त्या गरीब व्यक्तींना नवीन कपडे भेट म्हणून देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आणि त्यात त्यांना मोठे यश प्राप्त झाले. अनेक लोक आजही त्यांना भेटल्यानंतर त्यांनी दिलेले वृक्ष किती मोठे झाले आहे याबद्दल माहिती देतात.
याशिवाय वटसावित्रीसारख्या सणांना त्यांनी महिलांना वडाच्या झाडाची रोपं भेट म्हणून देऊन एक वटसावित्रीचा नवीन पायंडा पाडला तर हरतालिकेसारख्या सणांना महादेवाच्या पिंडीवर वाहण्यासाठी पत्री म्हणून अनेक वृक्षांची पाने तोडली जातात, परंतु त्यांनी वृक्षांसाठी ही हिंसा मानली आणि हरतालिकेला झाडांची पानं न वाहता, वेगवेगळ्या झाडांचे केवळ एकच फूल त्यांनी पत्री म्हणून महादेवाच्या पिंडीवर वाहिले.
अशी आहे भूतदया
एकदा भर पावसात रात्रीच्या वेळी जवळच्याच गटारीत पडलेले कुत्र्याचे पिल्लू वेदनेने विव्हळताना बघून आशा राजपूत यांनी गटारीतून त्या पिल्लाला बाहेर काढले आणि त्याला घरात स्वच्छ धुतल्यावर पोत्यावर झोपवले आणि तिथूनच प्राण्यांसाठी काहीतरी करायचे या उद्देशाने त्यांनी ठरवून टाकले की, घराचे मुख्य प्रवेशद्वार पावसाळ्यात कधीच बंद ठेवायचं नाही. त्यामुळे मुक्या जनावरांना निवारा मिळू शकेल. एवढेच नाही तर घरातील धान्यातून मिळणारी चूर उकिरड्यावर किंवा कचरा गाडीत फेकून न देता पक्ष्यांसाठी त्या नेहमीच घराच्या आजूबाजूला पसरून ठेवतात. तसेच भाजीपाल्यांचे देठ किंवा टरबूज, डांगर, केळी यांच्या साली त्या कचरा गाडीत किंवा उकिरड्यावर न फेकता गाईंसाठी राखून ठेवतात. याशिवाय ज्या गरीब कुटुंबात गाय पाळलेली दिसते त्या कुटुंबात त्या गाईसाठी चारा पोहोचवतात किंवा त्या कुटुंबाला चाºयासाठी पैसे देतात, तर गोड पदार्थ ठेवलेल्या भांड्याला अचानक मुंग्या लागतात. तेव्हा ते भांडं तसंच धुवायला टाकणं म्हणजे मुंग्या मारण्याचे पातक हे संपूर्ण कुटुंब मानतं.
अशी जोपासली माणुसकी
कुठल्याही व्यक्तीच्या जीवनात अपघात ही अचानक घडणारी घटना असते हे ओळखूनच आशाताईंनी पाचोरा येथील सुधन हॉस्पिटल या ठिकाणी अचानक झालेल्या अपघातातील दोन नातेवाईकांसाठी मोफत टिफिन पोहोचवण्याचे उदात्त कार्य सुरू केले असून, त्यांनी तीन-चार वर्षांपूर्वी हे कार्य शहरातील ग्रामीण रुग्णालयातदेखील केले होते. याशिवाय डॉ.रुपेश पाटील यांच्या मदतीने त्यांनी जळगाव येथील अपंगांसाठी असलेल्या मनोबल होस्टेललादेखील 'अर्थपूर्ण' मदत केलेली आहे. शाळेतीलच गरीब आणि आई नसलेल्या मुलांना त्यांनी स्वत: आंघोळ घालून नवीन कपडे देऊ केले. ज्यामुळे आज ही मुलं शाळेत येताना एक कृतज्ञतेचा आनंद घेऊन शाळेत येत असतात. दिवाळीला फटाके फोडण्याऐवजी तेच पैसे ‘प्रदूषणमुक्त’ दिवाळी साजरी करून शेतकऱ्यांना बी-बियाण्यांसाठी देणारे हे कुटुंब आहे. आपल्या कुटुंबापुरता आणि ठरावीक क्षेत्रापुरते जरी हे कार्य त्या करत असल्या तरीसुद्धा आज अनेकांना त्यांच्याकडून हे मानवतेचे आणि भूतदयेचे धडे घेण्यासारखे असून अनेकांना त्यातून प्रेरणा मिळू शकते यात शंका नाही.

Web Title: Villages with the smell of beautiful flowers!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.