जळगाव जिल्ह्यात दिग्गज नेत्यांच्या सभांनी गाजली विधानसभा निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 12:33 PM2019-10-25T12:33:15+5:302019-10-25T12:33:53+5:30

मोठ्या सभा होऊनही भाजपच्या जागा घटल्या

Vidhan Sabha elections held in Jalgaon district | जळगाव जिल्ह्यात दिग्गज नेत्यांच्या सभांनी गाजली विधानसभा निवडणूक

जळगाव जिल्ह्यात दिग्गज नेत्यांच्या सभांनी गाजली विधानसभा निवडणूक

Next

जळगाव : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जळगाव जिल्ह्यात विविध पक्षांच्या दिग्गज नेत्यांच्या सभा होऊन आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या गेल्या. त्यामुळे या सभा चांगल्याच गाजल्या. जळगावात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजप नेत्यांच्या सर्वाधिक सभा झाल्या, तरीदेखील २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत भाजपच्या जागा घटून सहावरून चारवर आल्या. विशेष म्हणजे काँग्रेसच्या एकाही नेत्याची सभा न होता या निवडणुकीत काँग्रेसने आपले खाते उघडले तर राष्ट्रवादी काँग्रेसने एका ठिकाणची जागा गमवून दुसऱ्या ठिकाणी विजय मिळविला. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा कायम राहिली.
विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली तेव्हापासून जिल्ह्यात जोरदार प्रचार सभा झाल्या. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जळगावात सभा झाली. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी यांची चाळीसगाव येथे तर केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांची सावदा, फैजपूर येथे सभा झाली. सोबतच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची रावेरला तर गुजरातचे खासदार सी.आर. पाटील यांची जळगावला सभा झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची पारोळा, शेंदुर्णी, चाळीसगाव, येथे तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिचणीस अमोल मिटकरी भडगाव, जामनेर, चाळीसगाव, अमळनेर, खासदार अमोल कोल्हे यांची एरंडोल, बोदवड, शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे-पाटील यांची पाचोरा येथे तर एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांची फैजपूर आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची चाळीसगाव येथे सभा झाली होती.
आरोप आणि प्रत्यारोपांच्या फेºया
‘३७०’ पुन्हा लावून दाखवा - मोदी
जम्मू-काश्मिरला विकासाच्या मूळ प्रवाहात आणण्याचे काम भाजपने केले. विरोधक मात्र शत्रू राष्टÑाची भाषा करीत आहेत. हिंमत असेल तर ‘३७०’ पुन्हा लावण्याचे आश्वासन द्यावे, असे आव्हान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना दिले होते.
पवारांची मानसिकता ढासळली - मुख्यमंत्री फडणवीस
उत्तर आम्हालाही देता येते. मात्र हातवारे करायला आम्ही काही ‘नटरंग’ नाही’ अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांच्यावर केली. पवारांची मानसिकता ढासळल्याने असे हातवारे करीत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला होता.
५ वर्षात काय केले ? - शरद पवार
सत्ता आल्यानंतर आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे सत्ताधारी सांगत आहेत. मग पाच वर्षे त्यांनी काय केले. मला घरी जाऊन सातबारा कोरा झाला की नाही हे पहावे लागेल, असा चिमटा ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना काढला.
मुस्लिमांना आरक्षण का नाही - खासदार असदुद्दीन ओवेसी
महाराष्ट्रात भाजप सरकार मराठा समाजाला आरक्षण देऊ शकते, मग मुस्लीम समाजाला का आरक्षण देत नाही. हा मुस्लीम समाजावार अन्याय होत आहे, अशी टीका एआयएमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सरकारवर केली.
भाजपच्या सर्वाधिक सभा होऊन जागा घटल्या
प्रचारादरम्यान सर्वाधिक सभा भाजपच्या नेत्यांच्या झाल्या. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, गुजरातचे खासदार सी.आर. पाटील यांच्या सभा झाल्या. असे असले तरी २०१४मध्ये जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघापैकी सहा जागांवर विजय मिळविणाºया भाजपच्या या निवडणुकीत जागा वाढण्यापेक्षा दोन जागा घटल्या. यामध्ये मुक्ताईनगर, रावेर या दोन जागा भाजपने गमावल्या.
काँग्रेसची सभा न होता उघडले खाते
२०१४च्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात काँग्रेसची एकही जागा निवडणून आली नव्हती. या वेळी काँग्रेसने रावेर मतदार संघातून उमेदवार दिले. प्रचारादरम्यान काँग्रेसच्या एकाही नेत्याची सभा झाली नाही. तरीदेखील काँग्रेसने ही जागा जिंकून जिल्ह्यात या वेळी आपले खाते उघडले.
राष्ट्रवादीने एक गमावली, एक जिंकली
राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात १० ठिकाणी उमेदवार दिले. त्यांच्या प्रचारासाठी दिग्गजांच्या सभा झाल्या. २०१४मध्ये एरंडोल मतदार संघाच्या एकमेव ठिकाणी विजय मिळविणाºया राष्ट्रवादी काँग्रेसने या वेळी ही जागा गमावली. मात्र अमळनेर मतदार संघात विजय मिळवित जिल्ह्यातील एक जागा कायम राखली.

Web Title: Vidhan Sabha elections held in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव