फी न घेता डॉक्टरांनी वाचविले तरुणीचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 18:18 IST2019-05-13T18:17:56+5:302019-05-13T18:18:36+5:30
कौतुक : डॉ. सुनील राजपूत यांची माणुसकी

फी न घेता डॉक्टरांनी वाचविले तरुणीचे प्राण
चाळीसगाव : उष्माघाताने बेशुद्ध पडलेल्या विद्यार्थिनीवर तातडीने व मोफत औषधोपचार करून शहरातील डॉ.सुनील राजपूत यांनी या विद्यार्थिनीचे प्राण वाचविले. याबद्दल मान्यवरांनी त्यांचा सत्कारही केला.
नुकतीच ही घटना घडली होती. मांदुर्णे येथील रहिवाशी व चाळीसगावच्या आर्टस, सायन्स अँड कॉमर्स कॉलेजची १२ वीची विद्यार्थिनी हर्षदा प्रताप पाटील ही लक्ष्मीनगर येथे क्लास करीता आली असता अचानक ती खाली कोसळली. यावेळी प्रा. अश्विनी वानखेडकर यांनी प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला, व विद्यार्थ्यांच्या मदतीने तात्काळ डॉ. सुनील राजपूत यांच्या दवाखान्यात आणले. डॉ. राजपूत यांनी क्षणाचा विलंब न लावता लगेच उपचार सुरू केलेत. मात्र मेडिकल वरून औषधी आणायलाही कोणाकडे पैसे नव्हते, त्यावेळी डॉ. राजपूत यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वत: कडून औषध उपचार केलेत. दोन तासांनी विद्यार्थिनी शुद्धीवर आली. डॉक्टरांनी पैसे न पाहता मुलीवर उपचार केल्यानेच तिचे प्राण वाचले. सर्व विद्यार्थ्यांनी उन्हाळ्यात काय काळजी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. तर यापुढेही गरजवंतांना आमच्या राजपूत मित्र मंडळाच्या माध्यमातून सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले.
हर्षदा हिने डॉ. राजपूत यांचे आभार मानले. दरम्यान यावेळी जेष्ठ नागरिक प्रीतमदास रावलानी हे देखील येथे उपस्थित होते. त्यांनीही डॉक्टर राजपूत यांचे अभिनंदन केले. यावेळी मंडळाचे सदस्य डॉ. संतोष मालपुरे, व विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित होते.