सत्तेच्या सारीपाटात बळीराजा बेहाल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 11:54 PM2019-11-06T23:54:15+5:302019-11-06T23:59:19+5:30

एडिटर्स व्ह्यू : मिलिंद कुलकर्णी 

The victim is sitting on the edge of power | सत्तेच्या सारीपाटात बळीराजा बेहाल 

सत्तेच्या सारीपाटात बळीराजा बेहाल 

googlenewsNext

महाराष्ट्रात सत्ता कुणाची यावी यासाठी मुंबई, दिल्ली, नागपूर अशा वेगवेगळ्या ठिकाणी हालचाली, घडामोडी, भेटीगाठी शिगेला पोहोचलेल्या असताना राज्यातील बळीराजा बेहाल आहे. हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावला, चार महिन्यांची मेहनत मातीमोल झाली आणि भविष्य अंधकारमय झाले असताना मदतीचा ठोस हात आणि विश्वास दिला जात नसल्याचे दुर्देवी चित्र संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येत आहे. आम्हीच शेतकºयांचे कैवारी असल्याचा आव आणीत सर्वपक्षीय पुढारी रस्त्यालगत असलेल्या शेताच्या बांधावर फोटोसेशन करुन जात आहेत, हे दृष्य मोठे वेदनादायक आहे. 
एक अर्थपूर्ण संदेश सध्या समाजमाध्यमांमध्ये फिरत आहे. त्याचा मतीतार्थ असा की, तुमची एखादी वस्तू घराबाहेर उघड्यावर ठेवून रात्री निवांत झोपून बघा;  झोप लागेल की, जीव त्या वस्तूत गुंतून राहील? या प्रश्नाचे उत्तर देताना बळीराजाला समोर आणा. तिन्ही ऋतूंमध्ये संपूर्ण कुटुंब पूर्ण दिवस आणि पिकांना पाणी देण्यासाठी रात्री अपरात्री शेतात घालवणाºया बळीराजाचे जीवन संपूर्ण निसर्ग आणि त्यानंतर शासन-प्रशासनावर अवलंबून राहिलेले आहे. जगाचा पोशिंदा असे त्याला  म्हटले जात असले तरी त्याची प्रत्येक ठिकाणी अडवणूक केली जात आहे. दु:ख याच गोष्टीचे आहे की, त्याची अडवणूक, नाडवणूक करणारे हे देखील शेतकरीपूत्र, भूमिपूत्र आहेत. शेतकºयाला कोणताही पक्ष नसतो, पण विरोधी पक्ष हा त्याचा आवाज बनतो, हे सत्य आहे. मग विरोधात कोणताही पक्ष असो, तो शेतकºयाच्या हक्कासाठी झगडतो. पण जेव्हा तोच राजकीय पक्ष सत्ताधारी बनतो, तेव्हा मात्र आपणच विरोधी पक्षात असताना केलेल्या मागणीचा सोयीस्कर विसर पडतो. शासकीय, तांत्रिक, प्रशासकीय अडचणींचा बहाणा करीत शाब्दिक कसरती केल्या जातात. 
आपल्या जळगाव जिल्ह्याचे उदाहरण घेऊया. शरद पवार हे विरोधी पक्षाचे नेते असताना त्यांनी जळगाव ते नागपूर अशी दिंडी काढली होती. नागपुरातील हिवाळी अधिवेशनावर काढलेल्या या मोर्चाने त्यावेळी इतिहास निर्माण केला. पुढे पवार यांना सत्तेचा सोपान चढण्यासाठी हा मोर्चा उपयुक्त ठरला. परंतु, याच पवार यांच्या केंद्रीय कृषीमंत्रीपदाच्या कार्यकाळात विदर्भासह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होताच. शेतीपेक्षा पवारांना क्रिकेटमध्ये अधिक रस असल्याची टीका विरोधकांनी ते बीसीसीआयचे अध्यक्ष झाल्यावर केली होतीच. एवढेच काय पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची महाराष्ट्रात सत्ता असताना संत मुक्ताई (मुक्ताईनगर), पुष्पदंतेश्वर (नंदुरबार) या सहकारी साखर कारखान्यांची विक्री खाजगी व्यक्तींना झाली, त्याचा फटका साखर कारखान्यातील समभागधारक शेतकरी आणि उस उत्पादकांना झाला. आता हेच पवार आणि त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष़ शेतकºयांच्या विषयावर सरकारला कोंडीत पकडत आहे. 
भाजपचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी पाच वर्षांपूर्वी विरोधी पक्षात असताना जळगावात आमरण उपोषण केले होते. कापसाला ६ हजार रुपये भाव द्या, अशी त्यांची प्रमुख मागणी होती. आठवडाभर हे उपोषण चालले. सरकारने ती मागणी काही मान्य केली नव्हती, परंतु स्वत: महाजन मंत्रिमंडळात असलेल्या भाजप-शिवसेना महायुतीच्या सरकारनेदेखील ही मागणी पाच वर्षात पूर्ण केली नाही. विरोधी पक्षात असताना केलेली मागणी सत्तेत आल्यानंतर पूर्ण करायची असतेच असे नाही, हे महाजन यांनी दाखवून दिले. त्यासाठी त्यांच्या पक्षाने गोंडस आश्वासन दिले. कोणत्याही उत्पादनाच्या भाववाढीपेक्षा शेतकºयाचे उत्पन्न दीडपट वाढेल असे आता केंद्र सरकार म्हणत आहे. अस्मानी आणि सुलतानी संकटांना तोंड देणाºया शेतकºयाला नियमित उत्पन्न मिळत नाही तर दीडपट मिळणार कधी? कर्जासाठी फिराफिर, कर्जमाफीसाठी निकषांची आडकाठी, पीकविम्यासाठी अडवणूक, बी-बियाणे, कीटकनाशकांच्या किंमती वाढलेल्या, पाणी आवर्तन, वीजेची उपलब्धता यासोबतच नैसर्गिक संकटातून पीक वाचले तर बाजारात भाव उतरलेले अशा स्थितीत बळीराजा कसा टिकाव धरणार? आत्महत्येऐवजी त्याला दुसरा मार्ग तरी उरला आहे काय?  
शेतकºयाचे कल्याण कोणी करावे, यासाठी सर्वच राजकीय पक्षांची मुंबईत लगबग सुरु आहे. आकडेमोड सुरु आहे. युती आणि आघाडीचे भेद विसरुन सगळ्या घडामोडी चालू आहेत. दुर्देव असे की, या सगळ्या घडामोडी घडत असताना बळीराजाचा वापर केवळ केला जात आहे. बांधावर सहली काढून शेतकºयाप्रती कळवळा दाखविला आणि राज्यपालांना निवेदन देऊन सोपस्कार आटोपला. आता सत्तेचा सारीपाट रंगविण्यात सारे कसे मग्न झाले आहे. उध्वस्त झालेले रान पहात डबडबलेल्या डोळ्यापुढे केवळ अंधकार पसरलेला बळीराजा सुन्न झालेला आहे. जगाचा पोशिंद्याची ही हालत असताना महाराष्ट्राचा राजा कोण होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. 

 

Web Title: The victim is sitting on the edge of power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.