बहिणाबार्इंच्या काव्याचे मौल्यवान पैलू : रम्य कल्पनाविलास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 00:49 IST2018-05-21T00:49:11+5:302018-05-21T00:49:11+5:30
‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा.ए.बी.पाटील यांनी ‘स्मृतीची चाळता पाने’ या सदरात ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या काव्याबद्दल सांगितलेले अनुभव.

बहिणाबार्इंच्या काव्याचे मौल्यवान पैलू : रम्य कल्पनाविलास
निरक्षर बहिणाबार्इंच्या उत्कट काव्यात आचार्यांनी सांगितलेली काव्याची तत्त्वं दृष्टीस पडतात. उत्कट भाव व त्याबरोबरच विचार सौंदर्य आणि रम्य कल्पनाविलास हे त्यांच्या काव्याचे मौल्यवान पैलू आहेत. बहिणाबार्इंच्या काव्यात उत्कट भाव असे काही अभिव्यक्त झाले आहेत की, वाचणाऱ्याच्या हृदयात त्याच प्रकारच्या भावना उत्स्फूर्तपणे जागृत होतात.
‘लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’सारख्या अप्रतिम काव्यपंक्ती तत्कालीन स्त्री जीवनाचे भावोत्कट कारुण्य प्रगट करतात. मोजक्या शब्दात एवढा मोठा आशय व्यक्त करणे भल्याभल्यांना जमत नाही. वाचक भारावून तर जातोच पण ह्या निरक्षर, अडाणी स्त्रीने तत्कालीन स्त्री जीवनाचा केवढा मोठा पट या पाच शब्दात मांडला आहे, ह्या विचाराने विस्मयचकितही होतो.
बहिणाबार्इंची बुद्धी चौकस होती. रोजचे जीवन जगत असताना आस-पास घडत असलेले प्रसंग, घटना यांचे सूक्ष्म निरीक्षण ती करीत असावी. तिच्या मनावर ती घटना कोरली गेली की तिची सजग कल्पनाशक्ती त्या घटनेला शब्दबद्ध करून चित्रात्मक पद्धतीने प्रभावीरित्या अभिव्यक्त करत होती. मोटेचे पाणी तिच्या पुढील कुंड्यात (थायन्यात) धो-धो ओसंडतं. हे दृष्य पाहून बहिणाबाई ‘हुंदडतं पानी जसं तान्हं पायन्यात’ अशी सुंदर उपमा देऊन व्यक्त करतात. धरतीवरची हिरवळ उडत उडत आकाशात गेली व आकाशाचा रंग निळा झाला. अशा रम्य कल्पनांचा प्रयोग त्यांच्या काव्यात ठायी ठायी दिसतो. त्यांच्या काव्यात कल्पनेची भरारी आहे. पण त्याला वास्तवाची किनार आहे. हवेतल्या कोलांट उड्या नाहीत. वडाची हिरवी पानं व त्याला आलेली लालचुटूक फळं बघून वडाच्या झाडाला पोपटाचं पीक आल्याची कल्पना बहिणाबाईच करू शकते. रोजच्या जगण्यातही असे अनेक प्रसंग येतात ज्यांना बहिणाबाई आपल्या अलौकिक प्रतिभेने शब्दबद्ध करतात. चूल पेटत नाही, धूर करते आहे, गृहिणी बहिणाबाई वैतागते व म्हणते,
‘पेट पेट धुक्कयेला किती घेशी माझा जीव
अरे इस्तवाच्या धन्या कसं आलं तुले हीव।’
विस्तवाला हीव येण्याची, थंडी वाजण्याची अफलातून कल्पना थक्क करणारी आहे. समाजात जगत असताना अवती भवती अनेक प्रकारची माणसे भेटत असतात. बहिणाबाई तिच्या भाषेत माणसंही वाचत होती. स्वार्थी माणसांचे लबाड व खोटे व्यवहार तिला रूचत नसावेत. ती म्हणते,
‘पाहिसन रे लोकांचे व्यवहार खोटे नाटे
तव्हा बोरी बाभयीच्या आले अंगावर काटे।’
जगण्याशी व निसर्गाशी एकरूप असल्याशिवाय असे वर्णन शक्य नाही.
सोपानदेवांनी एकदा बहिणाबाईला विचारले, ‘तू शेतात कष्टाची कामे करतेस, तुझी नजर जमिनीकडे आणि तुला हे सर्व विचार सुचतात तरी कसे?’ बहिणाबाईने उत्तर दिले, ‘धरतीच्या आरशामधी सरग (स्वर्ग) पाहते बाप्पा।’ (क्रमश:)