गर्दीच्या धास्तीने खासगीतही घेतली जातेय लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:12 IST2021-07-11T04:12:22+5:302021-07-11T04:12:22+5:30
डमी 903 लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसणे, गर्दी, गोंधळ आदी बाबी टाळण्यासाठी १३८६३ नागरिकांनी ...

गर्दीच्या धास्तीने खासगीतही घेतली जातेय लस
डमी 903
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लसीचा पुरेसा साठा उपलब्ध नसणे, गर्दी, गोंधळ आदी बाबी टाळण्यासाठी १३८६३ नागरिकांनी खासगी लसीकरण केंद्रांवर जाऊन लस घेतली आहे. कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोन्ही लस या केंद्रांवर उपलब्ध आहेत. शासकीय केंद्रांवर गेल्या चार दिवसांपासून लसच उपलब्ध नसल्याने लसीकरण मोहीम ठप्प आहे.
जिल्हाभरात ३५० पेक्षा अधिक शासकीय केंद्रांवर लसीकरण मोहीम सुरू आहे. यात आता सर्वच वयोगटाचे दोन्ही डोस सुरू असल्याने केंद्रांवरील गर्दी वाढली आहे. त्यात अनेक गर्दीच्या केंद्रांना अगदी मुबलक साठा मिळत असल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. दोन दिवसांपूर्वी शिवाजी नगरातील केंद्रावर गोंधळ उडाला होता. दरम्यान, केंद्रावर मोठ्या प्रमाणात गर्दी उसळत असल्याने हे केंद्रच कोरोनाचे हॉटस्पॉट ठरू शकतात, अशीही भीती व्यक्त करण्यात येत आहे. या भीतीनेही व सकाळपासून रांगेत उभे राहूनही नंबर लागत नसल्याने आता काही नागरिकांनी थेट खासगी केंद्रांकडे धाव घेतली आहे. त्यातच आता १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण पूर्णत: ऑनलाईन करण्यात आले आहे. मध्यंतरी ५० टक्के ऑनलाईन आणि ५० टक्के ऑफलाईन असे या वयोगटासाठी लसीकरणाचे नियोजन होते, मात्र, केंद्रांवरील गर्दी व गोंधळ वाढल्यामुळे पुन्हा पूर्णत: ऑनलाईन बंधनकारक करण्यात आले आहे.
आतापर्यंतचे लसीकरण
पहिला डोस ६७२३७१
दुसरा डोस १७१८०९
खासगी रुग्णालयातील आकडे काय सांगातात?
कोविशिल्ड : ५५६१
कोव्हॅक्सिन : ८३०२
विश्वप्रभा हॉस्पिटल ८३०२
गायत्री हॉस्पिटल २२९८
संवेदना १९०५
समता फाउंडेशन १३५८
शासकीय रुग्णालयात का नाही?
१ जिल्हाभरातील १३ हजारांवर नागरिकांनी शासकीय केंद्रांवर लस न घेता खासगी केंद्रांवर लस घेतलेली आहे. ही संख्याही मोठी आहे.
२ शासकीय केंद्रांवर कूपन पद्धत असते, कूपन घेण्यासाठी सकाळी चार वाजेपासून अनेक जण रांगेत उभे असतात. त्यातही प्रत्येकाला कूपन मिळेलच याची शाश्वती नसते.
३ गर्दीमुळे केंद्रांवरूनच कोरोनाचा अधिक प्रसार होण्याचा धोका अधिक असतो. त्यामुळेही कदाचित अनेकांनी शासकीय केंद्र वगळून खासगीत लसीकरण करून घेतले आहे.
४ ऑनलाईन बुकिंगमध्ये खासगी केंद्र ही लवकर उपलब्ध होतात, असेही काहींचे म्हणणे आहे. शासकीय केंद्र हे काही सेकंदात फुल्ल होऊन जातात.
शासकीय केंद्रांवर गर्दी खूप होत असून तातडीने नंबर लागत नाही, अनेक तास ताटकळत उभे राहावे लागत आहे. या ठिकाणाहून कोरोना होण्याचा धोका असतो. त्यामुळे खासगीत लस घेतली. - भावेश जंगले
शासकीय केंद्रांवर नंबर लागत नाही, शिवाय ऑनलाईन स्लॉट बुकिंग करायला खूपच अडचणी येत असतात. बुकिंगच होत नसल्याने शिवाय कोविडपासून सुरक्षा मिळणे सध्या स्थितीत महत्त्वाचे असल्याने आणि शासकीय केंद्रावर लसही उपलब्ध राहत नाही. - रितेश भिरुड