नगरपालिकेच्या सहकार्याने जामनेरला लसीकरण उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:17 IST2021-09-03T04:17:35+5:302021-09-03T04:17:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जामनेर : लसीचा होणारा कमी पुरवठा, नागरिकांचा मनस्ताप व तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने ...

नगरपालिकेच्या सहकार्याने जामनेरला लसीकरण उत्सव
लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : लसीचा होणारा कमी पुरवठा, नागरिकांचा मनस्ताप व तासन्तास रांगेत उभे राहावे लागत असल्याने आमदार गिरीश महाजन यांनी नगरपालिकेच्या सहकार्याने बुधवारी नगरपालिकेच्या माध्यमातून लसीकरणाचा महाउत्सव आयोजित केला. बाबाजी राघो मंगल कार्यालयात नागरिकांना चहा व बिस्कीटसोबत लसीकरण केले गेले.
येत्या महिन्याभरात शहरातील सर्व नागरिकांचे १०० टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे नगराध्यक्षा साधना महाजन यांनी सांगितले.
गेल्या आठवड्यात उपजिल्हा रुग्णालयात पहिल्या डोससाठी अवघे ४०० लस उपलब्ध झाल्याने नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आमदार महाजन यांनी याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून जामनेर शहरासाठी जास्तीच्या डोसची मागणी केली. यानुसार पहिल्या व दुसऱ्या डोससाठी दोन हजार डोस मिळाल्याने बाबाजी राघो मंगल कार्यालयात लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली. मोठे सभामंडप असल्याने ज्येष्ठ नागरिक व महिलांसह सर्वांनाच बसण्यासाठी खुर्च्यांची व्यवस्था केली होती.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनय सोनवणे, उपजिल्हा रुग्णालय, जी. एम. हॉस्पिटल, कमल हॉस्पिटलच्या परिचारिका व कर्मचारी, उपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील, गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, भाजप तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, संध्या पाटील, शीतल सोनवणे, महेंद्र बाविस्कर, नाजीम शेख, बाबूराव हिवराळे, दीपक तायडे, सुहास पाटील, आतीश झालटे, जितू पाटील यांनी सहकार्य केले.
जामनेर शहरातील नागरिकांचे १०० टक्के लसीकरण नगरपालिकेच्या सहकार्याने करावयाचे आहे. तालुक्यासाठी आज सात हजार ५०० लसीचे डोस मिळाले. त्यात जामनेरसाठी दोन हजार डोस मिळाल्याने नागरिकांना विनात्रास लसीकरण केले जात आहे. ग्रामीण भागातही सर्वांचे लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- गिरीश महाजन, आमदार, जामनेर